नवी दिल्ली : भारताचा पुरुष हॉकी संघ सलग दुसऱ्या वर्षी मलेशियात आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत सहभागी होणार नाही. पाकिस्तान संघाच्या उपस्थितीमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तान २०१४ च्या चॅम्पियन्स चषकादरम्यान झालेल्या वादाविषयी माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध एकही मालिका खेळणार नसल्याच्या भूमिकेवर हॉकी इंडिया ठाम आहे.सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धा २१ वर्षांखालील गटाची स्पर्धा असून भारताने २०१५ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकविले होते. या स्पर्धेचा एफआयएचचा थेट संबंध नाही. जानेवारीत हॉकी इंडियाने पाकविरुद्ध एकाही स्पर्धेत खेळणार नाही, अशी घोषणा केली होती. २०१४ च्या चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान खेळाडूंनी दाखविलेली बेशिस्त तसेच अश्लील हावभाव केल्याबद्दल पाकिस्तान विनाअट माफी मागेपर्यंत आमचा संघ तुमच्याविरुद्ध खेळणार नसल्याचे भारताने आधीच बजावले आहे.प्रकरण येथेच संपलेले नाही. मागच्यावर्षी लखनौ येथे झालेल्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाआधी या चषकात आम्ही खेळू नये असा भारताचा डाव असल्याचा आरोप पाकने भारतावर केला होता. भारताने हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून फेटाळून लावला. पण तरीही पाकने ज्युनियर विश्वचषकात भाग घेतला नाही. सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी संघ पाठवायचा नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. जोहोर चषक ही एफआयएचची अधिकृत स्पर्धा नसल्याने स्पर्धा खेळणे अनिवार्य नाही, असे हॉकी इंडियाचे प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)हॉकी इंडिया आणि आमचे खेळाडू २०१४ चा तो लाजीरवाणा प्रसंग विसरले असले तरी अलीकडे पाकने केलेला आरोप गंभीर आहे. या आरोपामुळे भारताने पाकविरुद्ध खेळायचे नाहीच अशी ठाम भूमिका घेतली.-आर. पी. सिंग, हॉकी इंडियाचे प्रवक्ते
पाकच्या उपस्थितीमुळे भारताची माघार
By admin | Published: April 15, 2017 4:27 AM