कटक : युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी यांनी केलेल्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने बाराबती स्टेडियममध्ये गुरुवारी अखेरपर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मलिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. भारताने ६ बाद ३८१ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ८ बाद ३६६ धावांत रोखला गेल्या. जेसन रायने (८२) संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने जो रुटसोबत (५४) दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. कर्णधार मॉर्गनने सूर गवसल्याचे संकेत देताना ८१ चेंडूंमध्ये १०२ धावांची खेळी केली. त्याने मोईन अलीसोबत (५५) सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची तर लियाम प्लंकेटसोबत (नाबाद २६) चार षटकांत ५० धावांची भागीदारी केली. पण त्याचे हे प्रयत्न संघाचा पराभव टाळण्यात अपुरेच पडले. इंग्लंडला अखेरच्या ८ षटकांत १०५ धावांची गरज होती. मॉर्गनने इंग्लंडच्या आशा कायम राखल्या होत्या. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी २२ धावांची गरज असताना मॉर्गन तंबूत परतला होता. बुम्राने त्याला चतुराईने धावबाद करुन भारतीयांचे टेन्शन कमी केले. इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावा असताना भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना केवळ ६ धावा दिल्या, अन भारताने जल्लोष केला. फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने १० षटकांत ४५ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. रविचंद्रन अश्विन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. इंग्लंडला वर्तमान भारत दौऱ्यात अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. यापूर्वी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांना ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. उभय संघांदरम्यान तिसरा व अखेरचा वन-डे सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणार आहे. युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी यांचा बाराबती स्टेडियममध्ये गुरुवारी जुना जोश अनुभवायला मिळाला. युवराज व धोनी यांनी झळकविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे लढतीत ६ बाद ३८१ धावांची मजल मारली. भारताची ३ बाद २५ अशी नाजूक अवस्था असताना या दोघांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी २५६ धावांची भागीदारी केली. जवळजवळ तीन वर्षांनंतर वन-डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत असलेला डावखुऱ्या युवराजने कारकिर्दीतील १४ वे आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक झळकावले. युवराजने यापूर्वीची अखेरची शतकी खेळी २०११ विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पाचव्या षटकात के.एल. राहुल (५), शिखर धवन (११) व फॉर्मात असलेला कर्णधार कोहली (५) यांना गमावले होते. या तिघांना व्होक्सने तंबूचा मार्ग दाखवला. गेल्या लढतीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या केदार जाधवने १० चेंडूंना सामोरे जाताना २२ धावा केल्या तर हार्दिक पांड्याने ९ चेंडूंमध्ये नाबाद १९ धावांचे योगदान दिले. रवींद्र जडेजाने ८ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)>युवराजने १५० धावांची शानदार खेळी केली. त्याची ही कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली. धोनीने सुरुवातीला सहकाऱ्याची भूमिका बजावली आणि त्यानंतर आपला पूर्वीचा जलवा दाखविला. त्याने १३४ धावांची खेळी केली. भारताची सुरुवातीला ३ बाद २५ अशी अवस्था झाली असताना, युवराज व धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी २५६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.>युवराजची शतकी खेळी इंग्लंडचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ख्रिस व्होक्सने (४-४६) संपुष्टात आणली. युवराजने १२७ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार व ३ षटकार लगावले. या खेळीदरम्यान युवराज भारतातर्फे इंग्लंडविरुद्ध वन-डेमध्ये सर्वाधिक धावा (१४७८) फटकावणारा फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकरचा (१४५५) विक्रम मोडला. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच शतकी खेळी केली. हे त्याचे कारकिर्दीतील दहावे शतक आहे. त्याने १२२ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व ६ षटकार लगावले. या खेळीदरम्यान तो वन-डेमध्ये २०० पेक्षा अधिक षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला. धोनीने आजच्या खेळीत भारतात ४००० वन डे धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा सचिन पाठोपाठ (६९७६ धावा) तो दुसरा फलंदाज आहे.>धावफलकभारत : लोकेश राहुल झे. स्टोक्स गो. व्होक्स ५, शिखर धवन त्रि.गो. व्होक्स ११, विराट कोहली झे. स्टोक्स गो. व्होक्स ८, युवराज सिंग झे. बटलर गो. व्होक्स १५०, महेंद्रसिंग धोनी झे. विली गो. प्लंकेट १३४, केदार जाधव झे. बॉल गो. प्लंकेट २२, हार्दिक पांड्या नाबाद १९, रवींद्र जडेजा नाबाद १६, अवांतर १६. एकूण : ५० षटकांत ६ बाद ३८१ धावा. गडी बाद क्रम : १/१४, २/२२, ३/३५, ४-२८१, ५-३२३, ६-३५८. गोलंदाजी : व्होक्स १०-३-६०-४, विली ५-०-३२-०, बॉल १०-०-८०-०, प्लंकेट १०-१-९१-२, स्टोक्स ९-०-७९-०, अली ६-०-३३-०.इंग्लंड : जेसन रॉय त्रि. जडेजा ८२, अॅलेक्स हेल्स झे. धोनी गो. बुम्राह १४, रूट झे. कोहली गो. अश्विन ५४, मॉर्गन धावचित १०२, बेन स्टोक्स त्रि. अश्विन १, बटलर यष्टीचित धोनी गो. अश्विन १०, मोईन अली त्रि. भुवनेश्वर कुमार ५५, ख्रिस वोक्स त्रि. बुम्राह ५, प्लुम्केट नाबाद २६, विली नाबाद २६. अवांतर : ५ एकुण : ५० षटकांत ८ बाद ३६६. गडी बाद क्रम : १/२८, २-१२८, ३/१७०, ४/१७३, ५/२०६, ६/२९९, ७/३०४, ८/३५४. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-१-८३-१, बुम्राह ९-०-८१-२, जडेजा १०-०-४५-१, हार्दिक पंड्या ६-०-६०-०, अश्विन १०-०-६५-३, केदार जाधव ५-०-४५-०.
भारताची मालिकेत विजयी आघाडी, युवराज- धोनी तळपले
By admin | Published: January 20, 2017 5:19 AM