नवी दिल्ली : ‘भारत - आॅस्टे्रलिया कसोटी मालिका आता रोमांचक स्थितीत आली असून धरमशाला येथे होणारा अंतिम सामना निर्णायक ठरेल. शिवाय येथील वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली परिस्थिती पाहता खेळपट्टीबाबत भारतीय संघामध्ये अस्वस्थता असेल,’ असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने केले. एका वृत्त संकेतस्थळाशी बोलताना जॉन्सनने सांगितले, ‘‘धरमशालाचे मैदान शानदार आहे. मी हे मैदान एकदाच पाहिले असून त्या वेळी येथील खेळपट्टीवर गवत होते. त्यामुळे माझ्या मते आॅस्टे्रलियन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असेल आणि भारतीयांमध्ये काहीसा अस्वस्थपणा असेल.’’त्याचप्रमाणे, जॉन्सनच्या मते मालिकेतील अखेरच्या कसोटीसाठी आॅस्टे्रलियन संघात स्टीव्ह ओकीफेच्याऐवजी जॅक्सन बर्डला संधी मिळू शकते, असे मत व्यक्त केले. याबाबत तो म्हणाला, की ‘माझ्या मते आॅस्टे्रलियाने या सामन्यात एका फिरकीपटूसह खेळावे. फिरकी गोलंदाजांनी मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्यांच्यावर येथे चांगल्या कामगिरीचा दबाव होता. मालिकेत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असल्याने कोणाला संधी द्यावी, हे ठरवणे अवघड आहे. परंतु माझ्या मते अनुभवाला प्राधान्य द्यावे.’’बर्डला अंतिम सामन्यासाठी प्राधान्य देताना जॉन्सनने सांगितले, ‘‘अंतिम सामन्याची खेळपट्टी आॅस्टे्रलियाप्रमाणे असल्यास मला वाटते, की लिआॅनला अंतिम संघात घेऊन तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून बर्डला संधी द्यावी.’’ (वृत्तसंस्था)२७व्या कसोटी केंद्रासाठी धरमशाला सज्ज-धौलाधर पर्वतराजीत वसलेले समुद्र सपाटीपासून १३१७ मीटर उंचीवर निसर्गाच्या सान्निध्यात उभारण्यात आलेले धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे (पीएचसीए) स्टेडियम जगातील ११४वे आणि भारतात २७वे कसोटी केंद्र बनण्यास सज्ज झाले आहे.निसर्गरम्यस्थळी वसलेल्या या स्टेडियममध्ये शनिवारपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात चौथा आणि मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. याआधी तीन वन-डे तसेच आठ टी-२० सामन्यांचे आयोजन येथे झाले. भारताने तीनपैकी दोन वन-डे जिंकले तर एका सामन्यात पराभव पत्करला. भारताच्या वाट्याला येथे द.आफ्रिकेविरुद्ध एकमेव टी-२० सामना आला. त्यातही संघ पराभूत झाला होता. ऑस्ट्रेलियालादेखील येथे खेळण्याचा अनुभव आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक टी-२० चा सुपर-टेन सामना त्यांनी आठ धावांनी गमावला होता. त्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ हाच आॅस्ट्रेलियाचा कर्णधार होता. बीसीसीआयने मागच्या वर्षी कसोटीचे आयोजन नव्या स्थळांवर करण्याचा निर्णय घेताच सहा महिन्यात इंदूर, राजकोट, विशाखापट्टणम, पुणे आणि रांचीपाठोपाठ धरमशाला देशातील सहावे नवे केंद्र बनले. याआधी २००८ मध्ये नागपूरचे जामठा आणि २०१० मध्ये हैदराबादच्या उप्पल स्टेडियमला कसोटी केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली होती. भारतात ईडन गार्डनवर सर्वाधिक ४० तर लंडनच्या लॉर्डस्वर सर्वाधिक १३३ कसोटी सामन्यांचे आयोजन झाले.
खेळपट्टी भारताची झोप उडवेल
By admin | Published: March 23, 2017 12:28 AM