शिवाजी गोरे,
रियो दि जानेरीयो, दि. १२- भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्याबरोबर भारतातून आलेल्या त्यांच्या सहका-यांकडे अॅक्रेडेशन कार्ड नाही आणि येथील स्वयंसेवकांबरोबर अरेरावीची भाषा करताना आढळले असल्यामुळे त्यांचे (गोयल यांचे) कार्ड रद्द का करून नये, असे पत्र भारताचे दल प्रमुख राकेश गुप्ता यांना रियो आॅलिम्पिक आयोजन समितीकडून पाठविण्यात आल्यामुळे भारतीय गोटा खळबळ उडाली आहे. . आशियाई खंडासाठी नेमलेले अधिकारी सराह पिटरसन यांनी पाठविलेल्या पत्रात म्हणले आहे की, क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या बरोबर येथे असलेले त्याचे सहकारी येथील स्वयंसेवकांबरोबर सहकार्य न करता त्याच्याबरोबर अरेरावी करत आहेत आणि त्यांना ज्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही, अशा झोनमध्येसुद्धा जात आहेत. आयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडविल्यावर त्यांच्याबरोबर या सहका-यांनी वाद घातला. हे आयोजन समितीच्या विरुद्ध आहे. आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान एका देशाच्या क्रीडामंत्र्याच्या सहका-यांकडून होत असलेले वर्तन अशोभनीय आणि नियमबाह्य आहे. त्यामुळे त्याचे अॅक्रेडेशन कार्ड का रद्द करून नये. त्याच्याबरोबर असणाऱ्या सहका-यांनी रिओ आॅलिम्पिक एरिना आणि कारियोका एरिना येथील स्वयंसेवकांबरोबर त्यांना प्रवेश नसलेल्या झोनमध्ये सोडले नाही म्हणून अरेरावी केली आहे. गोयल हे येथे भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आले आहेत, अशा प्रकारचे त्यांचे व त्यांच्या सहका-यांचे वर्तन योग्य नाही. यासंदर्भात भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या वतीने कळविण्यात आले आहे की अशा प्रकारचे कोणतेही पत्र आम्हाला मिळालेले नसून क्रीडामंत्री गोयल यांच्याकडून व त्यांच्या सहका-यांकडून कोणतेही वर्तन झालेले नाही. क्रीडामंत्री विजय गोयल यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील तीन ते चार अधिकारी आलेले आहेत.