ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या जाणा-या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेविरोधात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवणा-या भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या भलत्याच फॉर्ममध्ये असणा-या विराट कोहलीला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आलं आहे. शिखर धवन मात्र संघात पुनरागमन करु शकलेला नाही.
खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी विजय मिळविल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. कोहली म्हणाला, ‘भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात इंग्लंडविरुद्धची मालिका मोठी होती. त्यात आम्ही ४-० ने सरशी साधली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत. आमचे प्रत्येकाचे लक्ष ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाचे सोमवारी मुंबईत आगमन झाले. बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील सलामी लढत २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ दुबई येथील सराव शिबिर आटोपल्यानंतर मुंबईत दाखल झाला आहे. विमानतळाहून संघ थेट दक्षिण मुंबईतील हॉटेलसाठी रवाना झाला. ऑस्ट्रेलिया संघ ब्रेबोर्न स्टेडियममध्ये १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ १५ फेब्रुवारी रोजी पहिल्या सराव सत्रात सहभागी होणार आहे.
भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, अभिनव मुकुंद आणि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलिया संघ:
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, शॉन मार्श, पीटर हँड््सकाम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वॅड (यष्टिरक्षक), स्टीव्ह ओकीफी, मिशेल स्कार्ट, नॅथन लियोन, जोश हेजलवुड, एस्टन एगर, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेपसन व ग्लेन मॅक्सवेल.