किंग्स्टन : वेस्ट इंडिजला पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात दमदार सुरूवात केली आहे. विंडीजच्या १९६ धावांना प्रत्त्युत्तर देताना पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद १२६ धावा केल्या होत्या. के. एल. राहुल ७५ धावांवर तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होते.मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात संधी मिळालेल्या राहुलने संधीचे सोने केले. त्याने ५८ चेंडुत अर्धशतक झळकावले. दुसरा सलामीवीर शिखर धवन आज मोठी खेळी करू शकला नाही. परंतु त्याने २७ धावा करताना राहुलला चांगली साथ दिली. डँरेन ब्राव्होने रसेल चेसच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.पहिल्या डावात भारत अजून ७० धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ९ गडी बाद व्हायचे आहेत.तत्पूर्वी, भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ५२ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी ५२.३ षटकांत केवळ १९६ धावांत गुंडाळले. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन तर अमित मिश्राने एक बळी घेत अश्विनला मदत केली. विंडीजच्या ब्लॅकवूडने ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याची खेळी सर्वोत्तम ठरली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले.सबीना पार्कच्या हिरव्यागार पीचवर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डनचा नाणेफेकीचा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला. ईशांत तिसऱ्या षटकांतच सलग दोन बळी घेतले. अवघ्या ६ षटकांत विंडीजने ३ फलंदाज गमावले. दोन धक्क्यांमुळे विंडीजची अवस्था ६ षटकांत ११ धावांत ३ बळी, अशी झाली होती. सलामीवर ब्रेथवेट १, तर ब्राव्होला एकही धाव काढता आली नाही. दोघेही ईशांतचे बळी ठरले. तिसरा धक्का मोहंमद शमीने दिला. त्याने चंद्रिकाला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्लोन सॅम्युअल्स (१४) आणि जर्मेइन ब्लॅकवूड (६२) यांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. यामध्ये ब्लॅकवूडने महत्त्वपूर्ण ६२ धावांचे योगदान दिले. उपाहारापूर्वी त्याला अश्विनने पायचित केले. जलदगती गोलंदाजांनी आघाडीची फळी कापून काढल्यानंतर विंडीजच्या उर्वरित संघाला रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुरफटवले.भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ९२ धावांनी जिंकला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी लोकेश राहुल याला संधी दिली. तर, होल्डरने कार्लोस ब्रेथवेटच्या जागी मिगेल कमन्सिला संधी दिली.
भारताचे दमदार प्रत्युत्तर, १ बाद १२६ के. एल. राहुलच्या नाबाद ७५ धावा
By admin | Published: July 31, 2016 3:24 AM