बेंगळुरू : कर्णधार मिताली राजने सलामीवीर स्मृती मंदानासोबत केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर महिला संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा ३४ चेंडू व ८ विकेट राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. भारतीय महिला फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावत न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचे लक्ष्य खुजे ठरवले. मितालीने ८८ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ८१ धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीदरम्यान मितालीने वन-डे सामन्यांत पाच हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्सनंतर अशी कामगिरी करणारी मिताली जगातील दुसरी महिला फलंदाज ठरली. मितालीने स्मृतीसोबत (६६) दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौरने २५ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ३२ धावांची आक्रमक खेळी केली. भारताने २२१ धावांचे लक्ष्य ४४.२ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत २२० धावांची मजल मारली. सोफी डिवाइनने केलेली ८९ धावांची खेळी न्यूझीलंडच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. सोफीने १०२ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व ३ षटकार ठोकले. एमी सॅटरवेटने ४३ आणि कर्णधार सुजी बेट््सने २७ धावांचे योगदान दिले. भारतातर्फे डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने २५ धावांच्या मोबदल्यात ३ आणि एन. निरंजनाने ३५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. मालिकेतील पहिला सामना जिंकणाऱ्या भारताला त्यानंतर दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. आजच्या लढतीत मिळविलेल्या विजयाचा भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियनशिपसाठी लाभ मिळणार नसला, तरी भारताने मालिका जिंकण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. पाचवा व अखेरचा सामना ८ जुलै रोजी खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
मितालीच्या नेतृत्वाखाली भारताचा शानदार विजय
By admin | Published: July 07, 2015 1:09 AM