ढाका : भारतीय लष्कराने गुरुवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक्स करून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले असतानाच हॉकीच्या मैदानातही भारताने पाकिस्तानचा फडशा पाडला. बांगलादेशात सुरू असलेल्या १८ वर्षांखालील ज्युनिअर एशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ३-१ गोलफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.भारत प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे, हे गुरुवारच्या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले. उपांत्य सामन्यात शिवम आनंद, दिलप्रीतसिंह आणि नीलम संजीप जैश हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कुंवर दिलराज सिंह याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. भारताचा अंतिम सामना शुक्रवारी यजमान बांगलादेशाबरोबर होईल.भारतीय संघाने सातव्या मिनिटालाच १-० अशी आघाडी घेतली. शिवम आनंदने ही आघाडी मिळवून दिली होती. ३२व्या मिनिटाला दिलप्रीतने ही आघाडी द्विगुणित करताना भारताला मजबूत पकड मिळवून दिली. उत्तरार्धात भारताने आपला दबदबा कायम ठेवला. खेळ सुरू होताच भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर आणि पाठोपाठ पेनल्टी स्ट्रोक मिळाला; पण पाकिस्तानी गोलकीपर वकारने हा गोल वाचविण्यात यश मिळविले. नंतर लगेचच ४६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नीलम संजीपने भारताचा तिसरा गोल केला. पाकिस्तानचा एकमेव गोल अमजद अली खान याने ६३व्या मिनिटाला केला.या विजयानंतर क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ट्विटरवरून भारतीय युवा हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. भारताचा अंतिम सामना आता यजमान बांगलादेशाबरोबर शुक्रवारी होणार आहे. बांगलादेश संघाने सेमिफायनलमध्ये चिनी-तैपेईला ६-१ असे हरविले होते. (वृत्तसंस्था)
भारताचे सर्जिकल स्ट्राइक्स
By admin | Published: September 30, 2016 1:45 AM