नवी दिल्ली : डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये अव्वल संघ चेक प्रजासत्ताकविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आशिया-ओसनिया गटात परतलेल्या भारतीय संघाला या विभागात अव्वल मानांकन देण्यात आलेले आहे. डेव्हिस कप २०१६ साठी मंगळवारी संघांचे मानांकन जाहीर झाले. अमेरिकन विभाग ग्रुप एक, आशिया-ओसनिया ग्रुप एक व दोन आणि युरोप आफ्रिका ग्रुप एकचा ड्रॉ सँटियागोमध्ये जाहीर करण्यात आला. त्यात भारताला अव्वल, तर उझबेकिस्तानला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. या झोनमध्ये अन्य संघ चीन, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. भारत व उझबेकिस्तान संघांना मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या पहिल्या फेरीच्या लढतीत बाय मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत २१ व्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ आणि २५ व्या क्रमांकावर असलेला उझबेकिस्तान संघ यांना २०१५ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्या झोनमध्ये मानांकन मिळाले आहे. भारताने यंदा दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडचा ३-२ ने पराभव करीत विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये स्थान मिळवले होते, पण भारताला दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या प्लेआॅफमध्ये चेक प्रजासत्ताकविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत विजय मिळवला असता, तर चार वर्षांनंतर भारताला १६ संघांच्या एलीट विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळाले असते. डेव्हिस कप विश्व ग्रुपमध्ये अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या ब्रिटन व बेल्जियम या संघांना अनुक्रमे अव्वल व दुसरे मानांकन देण्यात आलेले आहे. डेव्हिस कप स्पर्धेच्या नियमानुसार अंतिम फेरी गाठणाऱ्या दोन संघांना पुढील वर्षी होणाऱ्या विश्व ग्रुपमध्ये अव्वल व दुसरे मानांकन देण्यात येते. त्यांना वेगवेगळ्या हाफमध्ये स्थान देण्यात येते. तीन ते आठ क्रमांकावरील संघांना २१ सप्टेंबरपर्यंतच्या आयटीएफ डेव्हिस कप विश्व क्रमवारीच्या आधारावर मानांकन देण्यात आले. चेक प्रजासत्ताक संघाला तिसरे, स्वीत्झर्लंडला चौथे, फ्रान्सला पाचवे, अर्जेन्टिनाला सहावे, सर्बियाला सातवे आणि आॅस्ट्रेलियाला आठवे मानांकन देण्यात आलेले आहे.
भारताला अव्वल मानांकन
By admin | Published: September 22, 2015 11:55 PM