Neeraj Chopra Broke Self Olympics Record : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पुन्हा एकदा लक्षवेधून घेतले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरजनं डायमंड लीग स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये सेट केलेला स्वत:चा विक्रम मागे टाकला. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील ८९.४५ मीटर भालाफेकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. लुसाने येथील डायमंड लीग स्पर्धेत त्याने ८९.४९ मीटर भाला फेकला. या स्पर्धेतील नीरजचा हा आतापर्यंतचा हा सर्वात बेस्ट थ्रो आहे. विशेष म्हणजे हार्नियासारख्या समस्येनं त्रस्त असतानाही त्याने ही कमालीची कामगिरी करुन दाखवलीये.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मागे राहिलेल्या खेळाडूनं ९० मीटरसह टाकले मागे
नीरज चोप्रा बेस्ट थ्रोसह ९० मीटरच्या टार्गेटच्या अगदी जवळ पोहचला. पण तरीही त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्स याने त्याला मागे टाकले. या भालाफेकपटूनं ९०.६१ मीटर भाला फेकला. अँडरसन पीटर्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजच्या मागे राहिला होता. त्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.
९० मीटरच्या टार्गेटसाठी धडपडतोय नीरज नीरज चोप्रानं आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत ९० मीटर अंतर भाला टाकलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल मिळवल्यापासून तो ९० मीटरच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरताना दिसते. टार्गेट त्याच्या टप्प्यात दिसत असले तरी तो इथंपर्यंत पोहचू शकलेला नाही. स्टॉकहोम डायमंड लीग स्पर्धेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरीची नोंद केली होती. २०२२ मध्ये त्याने या स्पर्धेत ८९.९४ मीटर अंतरावर भाला फेकला होता.