ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 13 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकापोठापाठ एक मालिका जिंकत सुटलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 208 धावांनी विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आहे. भारताने दिलेल्या 459 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला.
अखेरच्या दिवशी बांगलादेशसमोर विजयासाठी 459 धावांचे आव्हान होते. रवींद्र जाडेजा, आर. अश्विन यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचे फलंदाज ढेपाळले. अश्विनने 4 , जाडेजाने 4 तर, इशांत शर्माने 2 गडी बाद केले. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर शाकीब अल हसनच्या रुपाने बांगलादेशला चौथा धक्का बसला.
रवींद्र जाडेजाने त्याला 22 धावांवर चेतेश्वर पूजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर 162 धावांवर कर्णधार मुशाफिकूर रहमानच्या रुपाने बांगलादेशला पाचवा धक्का बसला. त्याने 23 धावा केल्या. अश्विनने जाडेजाकरवी झेलबाद केले. एक बाजू लावून धरणारा महमदुल्लाह 64 धावांवर बाद झाला. त्याला इशांत शर्माने भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केले. साबीर रहमानलाही 22 धावांवर इशांतने पायचीत पकडले. रविवारी चौथ्या दिवसअखेर बांगलादेशच्या 3 बाद 103 धावा झाल्या होत्या.