ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.१९ - टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 'विराट' विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना भारताचा फलंदाज विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुऴे भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने १५. ५ षटकात चार बाद ११९ धावा केल्या. या सामन्यात फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक जास्त धावा कुटल्या. त्याने ३७ चेंडूत नाबाद एक षटकार आणि सात चौकार लगावत ५५ धावा केल्या. तर महेंद्र सिंह धोनीने नाबाद १३ धावा केल्या. विराट कोहली आणि युवराजच्या खेऴीमुऴे भारताने ९ षटकात ५० धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर गोलंदाज वहाब रियाजच्या गोलंदाजीवर युवराज सिंह २४ धावांवर झेलबाद झाला. त्याआधी भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला झटका बसला. रोहित शर्माला मोहम्मद आमिरने झेलबाद केले. तर, शिखर धवन सहा धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच सुरेश रैना अवघ्या शून्य धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद सामीने बाद केले.
पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वात जास्त २६ धावा केल्या. तर शारजील खान (१७), अहमद शेहजाद(२५), उमर अकमल (२२), शाहिद आफ्रिदी आठ धावांवर बाद झाला आणि सरफराज अहमदने नाबाद आठ धावा व मोहम्मद हाफिजने नाबाद पाच धावा केल्या.
तसेच, यासामन्यात गोलंदाज बुमराह पांड्या, सुरेश रैना, नेहरा आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद सामीने दोन, तर वहाब रियाज आणि मोहम्मद आमिरने प्रत्येकी एक बऴी घेतला.
या सामन्यात फलंदाज विराट कोहली सामनावीर ठरला.