ऑनलाइन लोकमत
कटक, दि. २ - श्रीलंकेच्या संघाला १९४ धावांवर सर्वबाद करत भारताच्या गोलंदाजांनी सामना सहज खिशात घातला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय फलंदाजांनी लंकेसमोर ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानापूढे लंकेने हार पत्करली आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये इशांत शर्माने ८ षटकांत ४ गडी बाद करत फक्त ३४ धावा दिल्या. तसेच उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. लंकेचा खेळाडू महेला जयवर्धने वगळता कोणत्याही खेळाडूला ४० धावसंख्या गाठता आली नाही. सहा चौकार आणि एक षटकार लगावत महेला जयवर्धनेने ४३ धावा केल्या, परंतू अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अजिंक्यकडे झेल गेल्याने अर्धशतक पूर्ण नकरताच त्याला तंबूत परतावे लागले. तिसारा परेरा २९ धावांवर व उपूल थारंगा २८ धावांवर बाद झाले.
वृंदामन शहा या खेळाडूने तिलकरत्ने दिनशान, कुमार संघकारा, प्रियरंजन, थिसारा परेरा आणि धामिका प्रसाद या खेळाडूंचे झेल घेत क्रिकेट रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले.