तिरुवनंतपुरम : युवा स्ट्रायकर रॉबिन सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर यजमान भारताने सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या ‘अ’ गटात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत श्रीलंकेचा २-० ने पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली. केरळमधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत रॉबिनची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने पहिला गोल ५१ व्या मिनिटाला तर दुसरा गोल ७३ व्या मिनिटाला नोंदवला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता, पण त्यानंतर सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या भारतीय संघाने शानदार कामगिरी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंका संघाला गोल नोंदवण्याच्या काही नामी संधी चालून आल्या, पण त्यांच्या खेळाडूंना त्याचा लाभ घेता आला नाही. श्रीलंका संघाने या स्पर्धेत सलामी लढतीत नेपाळविरुद्ध १-० ने विजय मिळवला होता, पण आजच्या लढतीत मात्र त्यांच्या खेळाडूंना विशेष छाप सोडता आली नाही. भारताला या स्पर्धेत रविवारी नेपाळच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)
सॅफ स्पर्धेत भारताची विजयी सलामी
By admin | Published: December 26, 2015 2:47 AM