डर्बी : स्मृती मानधना हिची स्फोटक अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या बळावर भारतीय संघाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी इंग्लंडवर ३५ धावांनी मात करताना विजयी प्रारंभ केला.भारताने विजयासाठी दिलेल्या २८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४७.३ षटकांत २४६ धावांत गारद झाला. इंग्लंडकडून फ्रॅन विल्सन हिने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ७५ चेंडूंत ६ चौकारांसह ८१ आणि कर्णधार हिथर नाईट हिने ६९ चेंडूंत एक चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. भारताकडून दीप्ती शर्मा हिने ४७ धावांत ३ गडी बाद केले.तत्पूर्वी, स्मृती मानधना या महाराष्ट्राच्या खेळाडूने चौफेर टोलेबाजी करताना ७२ चेंडूंत टोलावलेल्या ९0 धावांच्या स्फोटक खेळीच्या बळावर भारताने ३ बाद २८१, अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.स्मृती मानधना हिने पूनम राऊत हिच्या साथीने सलामीसाठी १४४ धावांची भागीदारी करताना भारताच्या धावसंख्येच्या मजबूत धावसंख्येची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर मिताली राज हिने वनडेतील सलग सातवे अर्धशतक पूर्ण केले. भारतातर्फे स्मृती मंदाना हिने ११ चौकार आणि २ षटकारांसह ७२ चेंडूंत ९0 धावांची नेत्रदीपक खेळी केली. पूनम राऊतने १३४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ८६ धावा केल्या, तर मिताली राजने ७३ चेंडूंत ८ चौकारांसह ७१ धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली. मिताली राज हिने गेल्या सहा वनडे डावांत नाबाद ६२, ५४, नाबाद ५१, नाबाद ७३, ६४ आणि नाबाद ७0 धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; परंतु स्मृती आणि पूनम यांनी त्यांना सुरुवातीला यश मिळवण्याच्या अपेक्षेला तडा देताना २६.५ षटकांत शतकी भागीदारी केली. स्मृती एकीकडे आक्रमक खेळत असताना पूनमने दुसऱ्या बाजूने तिला सुरेख साथ दिली. स्मृती दुखापतीतून सावरल्यानंतर तिचा अखेरच्या क्षणी संघात समावेश करण्यात आला. सलामीच्या जोडीच्या सुरेख फलंदाजीमुळे भारताने १0 षटकांत ५९ आणि संघाने २0 षटकांत बिनबाद ९७ धावा केल्या. शतकापासून वंचित राहिलेली स्मृती २७ व्या षटकात बाद झाली. धावफलकभारत : ५0 षटकांत ३ बाद २८१. (स्मृती मानधना ९0, पूनम राऊत ८६, मिताली राज ७१, हरमनप्रीत कौर नाबाद २४. नाइट २/४१, हेजल १/५१).इंग्लंड : ४७.३ षटकांत सर्वबाद २४६. (फ्रॅन विल्सन ८१, हिथर नाईट ४६. दीप्ती शर्मा ३/४७, शिखा पांडे २/३५).
भारताची विजयी सलामी
By admin | Published: June 25, 2017 12:14 AM