तिरुवअनंतपूरम : कर्णधार सुनील छेत्रीने अतिरिक्त वेळेत फ्री किकवर केलेल्या गोलच्या बळावर भारताने अफगाणिस्तानला २-१ ने नमवून दक्षिण आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे (सॅफ) सातव्यांदा अजिंक्यपद पटकाविण्याची किमया केली. तसेच २०१३ मध्ये अफगाणिस्तानकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचे उट्टेदेखील काढले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी गोल करण्याच्या काही संधी निर्माण केल्या, मात्र त्यांना गोल करता आला नाही. छेत्रीने केलेला हेडर गोलबारला लागून बाहेर गेला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक भूमिका घेतली. जेजेने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला. अफगाणिस्तानच्या जुबेर अमीरी याने ७० व्या मिनिटास गोल करीत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दोनच मिनिटांनी छेत्री याने हेडरद्वारे दिलेल्या पासवर जेजे लालपेखलुआने चेंडू गोलजाळ््यात धाडत संघाला १-१ बरोबरी साधून दिली. भारताचा संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दहाव्यांदा अंतिम फेरीत खेळत होता. त्यापैकी सात वेळा जेतेपद मिळविण्यात भारतीय संघाला यश आले आहे. अफगाणिस्तानने नेपाळमध्ये २०१३ मध्ये झालेल्या अंतिम फेरीत भारताला २-० ने पराभूत केले होते. त्याची परतफेड भारताने केली. स्थानिक प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबाजागतिक क्रमवारीत भारत १६६ व्या, तर अफगाणिस्तान १५० व्या स्थानी आहे. अंतिम सामन्यात भारताला स्थानिक प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा लाभला. त्यामुळे विजेतेपदानंतर खेळाडूंनी मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केले. केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या हस्ते भारतीय संघाला चषक देऊन गौरविले.निर्धारित वेळेत दोन्ही संघांना निर्णायक गोल करता आला नाही. अतिरिक्त वेळेत 101व्या मिनिटास छेत्रीने फ्री किकवर गोल करीत मिळवून दिलेली आघाडी निर्णायक ठरली. भारताला आघाडीची दोनदा संधी मिळाली होती, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात खेळाडू अपयशी ठरले.
भारताची जेतेपदाची किक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2016 3:06 AM