ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - लंकेनं एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा 4 गडी राखून पराभव केला. निरोशन डिकवेला व असेला गुणरत्ने यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 388 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेनं भारताचा एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. भारताने 2008मध्ये इंग्लंडच्या विरोधात विक्रमी 387 धावांचा पाठलाग करत विजय मिळवला होता. यापूर्वी श्रीलंका संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोत्तम कामगिरी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. त्या वेळी त्यांनी 352 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. श्रीलंकेने आशियातील सर्वात मोठे लक्ष्य आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाचवे सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा पराक्रम केला.दरम्यान, झिम्बाब्वे लंकेला विजयासाठी 388 धावांचे आव्हान दिले होते. डिकवेला बाद झाल्यानंतर सामनावीर गुणरत्नेने दिलरुवान परेराच्या (नाबाद २९) साथीने 67 धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. नवा कर्णधार दिनेश चंडीमलच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाला याच संघाविरुद्ध वन-डे मालिकेत २-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. आजच्या विजयामुळे त्या अपयशातून सावरण्यात श्रीलंका संघाला यश आले. झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रिमरने दुसऱ्या डावात चार व सामन्यात एकूण 275 धावांच्या मोबदल्यात 9 बळी घेतले. गुणरत्नेने 151 चेंडूंना सामोरे जाताना 6 चौकार लगावले. यष्टिरक्षक फलंदाज डिकवेला याला डावखुरा फिरकीपटू सीन विल्यम्सने बाद केले. त्यापूर्वी सुदैवी ठरलेल्या डिकवेलाने 81 धावांची खेळी केली. श्रीलंका यानंतर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताविरुद्ध ३ कसोटी, ५ वन-डे व एक टी-२० सामना खेळेल.
झिम्बाब्वेचा पराभव करत लंकेनं तोडला भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 8:39 PM
निरोशन डिकवेला व असेला गुणरत्ने यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 388 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला
अधिक वाचा