हाँगकाँग : अव्वल मानांकित भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अंतिम सामन्यात मलेशियाला २-० असे लोळवत ज्युनिअर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत मुलांचे विजेतेपद पटकावले. एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने मलेशियाला पुनरागमनाची फारशी संधी दिली नाही.भारताच्या मुलांच्या संघाने दुसऱ्यांदा या स्पर्धेत बाजी मारली आहे. याआधी २०११ साली भारताच्या मुलांनी येथे जेतेपद उंचावले होते. कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धक्का देत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या स्पर्धेत भारताचा तुफान फॉर्ममध्ये असलेल्या वेलावन सेंथिलकुमारने निर्णायक खेळ केला. आशियाई वैयक्तिक आणि ब्रिटिश ज्युनिअर ओपन विजेत्या सेंथिलकुमारने मलेशियाचा द्वितीय मानांकित ओंग साई हुनला धक्का देत भारताचे विजेतेपद निश्चित केले. या शानदार कामगिरीनंतर आनंदित झालेले भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पोंचा यांनी सांगितले की, ‘या स्पर्धेत भारताची कामगिरी शानदार ठरली. अंतिम सामन्यातील एकतर्फी खेळ जबरदस्त होता. याच कामगिरीची भविष्यातही अपेक्षा आहे.’ (वृत्तसंस्था)सारंग यांची एएसएफच्या उपाध्यक्षपदी निवडभारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघाचे अध्यक्ष देवेंद्रनाथ सारंगी यांची रविवारी आशियाई स्क्वाश महासंघाच्या (एएसएफ) उपाध्यक्षपदी निवड झाली. संघटनेच्या ३७व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये दोन तृतीयांश बहुमतांनी सारंगी यांची निवड झाली. विशेष म्हणजे एएसएफचे उपाध्यक्षपदी निवडून येणारे सारंगी दुसरे भारतीय ठरले आहेत. विद्यमान उपाध्यक्ष पाकिस्तानचे सय्यद राजी नवाज यांच्या जागी सारंग यांची निवड झाली.जागतिक स्क्वॉश संघटनेचे माजी अध्यक्ष भारताचे एन. रामचंद्रन यांची याआधी एएसएफच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. रामचंद्रन यांनी सांगितले की, ‘आणखीन एक भारतीय स्क्वॉशच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत आल्याने मी खूश आहे. भारतीय स्क्वॉशसाठी हा रविवार अत्यंत लक्षात राहणारा आणि शानदार ठरला. कारण, भारताच्या ज्युनिअर संघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण मिळवल्यानंतर दुसरीकडे सारंग यांची एएसएफच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.’
भारताच्या युवांनी पटकावले सुवर्ण
By admin | Published: February 06, 2017 1:34 AM