ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. 15- भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिस-या वन-डेत भारतानं झिम्बाब्वेचा 10 गडी राखून धुव्वा उडवला आहे. नागपूरचा सुपुत्र फैज फझलनं पदार्पणातच नाबाद राहत 61 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार लगावत 55 धावा काढून अर्धशतक पार केलं आहे. तर लोकेश राहुलनंही नाबाद खेळीच्या जोरावर 4 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला आहे. फैज फझल आणि लोकेश राहुलनं नाबाद खेळत 126 धावांची भागीदारी केली आहे.
तत्पूर्वी झिम्बाब्वेकडून शिंबदाने ३८ धावांची खेळी केली. सलामीविर चामू चिभाभाने २७ धावांची खेळी केली. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. ग्रीम क्रेमर, तेंडाई चतारा, डाई चिसोरो, क्रेग इरविन, नेविले मेजिवा, तिमीके यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारताकडून जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४ फलंदाज बाद केले, तर चहलने २, पटेल आणि कुलकर्णीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत चांगली गोलंदाजी केली.