कोलंबो : कर्णधार विराट कोहलीसह आघाडीच्या भारतीय फलंदाजांनी श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत संपलेल्या दोन दिवसांच्या सराव सामन्यात जोरदार फटकेबाजी करीत ९ बाद ३१२ धावा उभारल्या.शुक्रवारच्या ३ बाद १३५ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासाठी कोहलीने अर्धशतक फटकाविले. मधल्या फळीतील अजिंक्य रहाणे (४०), रोहित शर्मा (३८) आणि शिखर धवन (४१) यांनीही योगदान दिले. कोहली-रहाणे यांनी शनिवारी आठ षटके खेळल्यानंतर सहकाऱ्यांना संधी दिली. कोहलीने ७८ चेंडूंत आठ चौकार, तर रहाणेने ५८ चेंडंूत तीन चौकार मारले. रोहित आणि शिखर यांनी ८० धावांची भागीदारी केली. हे दोघे १६ षटके खेळून निवृत्त झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ब्रेक घेणाऱ्या रोहितने ४९ चेंडू खेळून एक षट्कार व चौकार मारला. शिखरने ४८ चेंडूंत सात चौकार मारले. यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने नाबाद ३६, अष्टपैलू हार्दिक पांड्या याने १३ आणि रवींद्र जडेजाने ३२ चेंडूंत १८ धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुशालने १४ षटकांत ८१ धावा देत दोन गडी बाद केले. विश्वा फर्नांडो याने दोन आणि विकुम संजया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी शुक्रवारी भारतीय गोलंदाजांनी लंका बोर्ड एकादश संघाला १८७ धावांत रोखले होते. यादवने ४, तर जडेजाने ३ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकश्रीलंका अध्यक्ष एकादश सर्वबाद १८७ धावा. भारत ९ बाद ३१२ धावा (लोकेश राहुल ५४, विराट कोहली ५३, अजिंक्य रहाणे ४०, रोहित शर्मा ३८, शिखर धवन ४१, रिद्धिमान साहा नाबाद ३६, रवींद्र जडेजा १८. फर्नांडो २/३७, कौशल २/८१.)
भारत - श्रीलंका बोर्ड सराव सामना अनिर्णीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 2:50 AM