जकार्ता : ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई हिच्यावर सरळ सेटमध्ये मात करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना आज, रविवारी होणार आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेनवर सिंंधूने २१-१९, २१-१० अशा फरकाने विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सिंधूने सिंगापूर आणि इंडिया ओपनची उपांत्य फेरी गाठली. फायनलमध्ये तिची गाठ जपानची चौथी मानांकित अकाने यामागुची हिच्याविरुद्ध पडेल. मागील चार लढतीत सिंधूने यामागुचीला नमविले आहे. ऑस्ट्रेलियन, स्विस आणि ऑल इंग्लंड ओपन जिंकणारी चेन यंदाच्या मोसमात दमदार खेळ करीत होती. सिंधूने मात्र तिला संधीच दिली नाही.
पहिल्या गेममध्ये सिंधू आणि चेन युफेन यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये फक्त दोन गुणांच्या फरकाने सिंधू जिंकली. पहिला गेम जिंकल्यावर मात्र सिंधूचा आत्मविश्वास दुणावला. दुसºया गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवून सामना जिंकला. सामना मोठ्या रॅलीजने सुरू झाला. त्यावेळी सिंधू ४-७ अशी पिछाडीवर होती. त्यानंतरही सिंधूने सलग पाच गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवले. ब्रेकनंतर सिंधूने आठपैकी सात गुण खेचून आणले आणि गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये४-० ने आघाडी मिळविताच सिंधूने वेगवान स्मॅश मारून खेळावर प्रभुत्व गाजवले.