नवी दिल्ली : पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर कोर्टवर पुनरागमन करणारा भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या इंडोनेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत चमकदार कामगिरीसह दणदणीत पुनरागमन करण्याचा निर्धार प्रणयने केला आहे.२०१४ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविलेला प्रणय पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याचवेळी त्याने पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावण्याचा निर्धार केला आहे. मात्र, त्याचवेळी अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने या स्पर्धेत प्रणयचा मोठा कस लागेल. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वीस ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर प्रणयच्या पायाला दुखापत झाली. यामुळे तो पुढील स्पर्धेसाठी सज्ज होऊ शकला नाही. त्याचवेळी त्याने यूएस ओपन आणि कॅनडा ओपनमध्ये सहभाग घेतला होता. परंतु, पाठीच्या दुखापतीमुळे त्याला लौकिकानुसार प्रदर्शन करता आले नाही. त्याचवेळी, प्रणयने पुन्हा एकदा येथे बाजी मारून दोन वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था) दखल घेण्याची बाब म्हणजे, सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे प्रणयला थॉमस कप स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती. तसेच, सिंगापूर ओपन स्पर्धेदरम्यान त्याच्या पायाच्या अंगठ्यालाही दुखापत झाली.यानंतर खूप वेळ उपचार घेतल्यानंतर त्याने कॅनडा व यूएस ओपनमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, दोन्ही स्पर्धेत सुरुवातीलाच त्याचे आव्हान संपुष्टात आले होते.
इंडोनेशिया ओपनसाठी एच. एस. प्रणय सज्ज
By admin | Published: September 02, 2016 3:07 AM