पिनांग (मलेशिया) : जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेली भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, नवव्या क्रमांकावरील पुरुष खेळाडू किदांबी श्रीकांत आणि अजय जयराम यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत गुरुवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या मानांकित सिंधूने बिगरमानांकित जपानच्या काओरी इमाबेपूचा एक तास तीन मिनिट रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१३, १३-२१, २१-१४ ने पराभव केला. सिंधूचा ३६ वे मानांकन असलेल्या काओरीविरुद्ध हा तिसरा विजय आहे. आता सिंधूची कामगिरी ३-० अशी झाली आहे. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या लिडावेनी फेनेत्रीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बुधवारी एकाच दिवशी दोन सामने जिंकणाऱ्या दुसऱ्या मानांकित श्रीकांतने तिसऱ्या फेरीच्या लढतीत १६ व्या मानांकित थायलंडच्या बुनसाक पोनसानाचा २१-१७, २१-१० ने केवळ ३३ मिनिटांत पराभव केला. या विजयासह श्रीकांतने २९ वे मानांकन असलेल्या बुनसाकविरुद्ध जय-पराजयची कामगिरी २-१ अशी केली. भारतीय खेळाडूला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता चीनच्या हुआंग युशियांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. १० व्या मानांकित अजय जयरामने मलेशियाच्या जुल्फादली जुल्किफलीची झुंज ११-२१, २१-८, २२-२० ने मोडून काढत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. दरम्यान महिला दुहेरीत ज्वाला व अश्विनी जोडीचा जपानच्या शिजुका मत्सुआओ आणि मामी नायतो यांनी २१-१४, २१-१७ ने पराभव केला.
सिंधू, के. श्रीकांतसह जयराम उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: January 22, 2016 2:58 AM