नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोेर्ड (बीसीसीआय) किंवा संबंधित राज्य संघटनेत नऊ वर्षे पदावर राहिलेली व्यक्ती बोर्डात पुन्हा पदावर राहू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.ज्येष्ठ विधिज्ज्ञ न्यायालय मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांनी या संदर्भात विचारणा केली होती. त्यावर सरन्यायाधीश तीरथसिंग ठाकूर यांच्या पीठाने स्पष्टीकरण देत सांगितले की, नऊ वर्षे बीसीसीआय किंवा राज्य संघटनेत पद सांभाळणारी व्यक्ती बोर्डात पुन्हा पद सांभाळण्यास अपात्र असेल. सुब्रह्मण्यम यांनी आमच्या निर्णयामधील बारीक चुकीकडे लक्ष वेधले. त्यात सुधारणा करीत कुठलीही व्यक्ती बीसीसीसीआय अथवा संबंधित राज्य संघटनेत नऊ वर्षे पदावर राहिली असल्यास बोर्डात पदाधिकारी बनण्यास ती व्यक्ती अपात्र समजली जाईल, असे ठाकूर यांच्या पीठाने स्पष्ट केले. नरीमन यांच्या स्थानी दिवाण यांची नियुक्तीबीसीसीआयच्या प्रशासकांच्या नावांची सूचना करण्यासाठी न्यायालयाची मदत करण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अॅड. एफ. एस. नरीमन यांच्या स्थानी सीनिअर वकील अनिल दिवाण यांची नियुक्ती केली. नरीमन यांनी मुख्य न्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाला सांगितले की, ‘त्यांनी २००९ मध्ये वकील म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक नाही.’त्यानंतर पीठाने दिवाण यांना याप्रकरणी न्यायमित्र म्हणून न्यायालयाची मदत करीत असलेले अॅडव्होकेट गोपाल सुब्रह्मण्यम यांना सहकार्य करण्याचे आणि बीसीसीआयचे कार्य बघण्यासाठी प्रशासकांची नावे सुचविण्यास सांगितले. पीठामध्ये न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोन्ही वकिलांना दोन आठवड्यांत संभाव्य प्रशासकांची नावे सुचविण्यास सांगितले आहे.
नऊ वर्षे पद सांभाळणारी व्यक्ती अपात्र
By admin | Published: January 04, 2017 3:11 AM