हरारे : पहिल्या वनडेत अवघ्या ४ धावांनी रोमहर्षक विजय नोंदविणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात रविवारी दुसरा विजय नोंदवून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. हा सामना जिंकल्यास २-० अशा विजयी आघाडीसह भारताला वर्चस्व गाजविणे शक्य होणार आहे. झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात कडवे आव्हान देऊन आम्हाला सहजपणे घेण्याची चूक करू नका, असा संदेश दिला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचे मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी झुंजार वृत्ती दाखविली नसती, तर भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले असते. रायुडूने १२४ धावा करून भारताला २५५ पर्यंत पोहोचविले. बिन्नीने ७७ धावा ठोकल्या. मुरली विजय १, मनोज तिवारी २ आणि रहाणे हे मात्र अपयशी ठरले होते. दुसरीकडे, झिम्बाब्वेने उत्कृष्ट कामगिरी बजावली. कर्णधार एल्टन चिगुंबुरा याने नाबाद १०४ धावा करून दिशाहीन भारतीय मारा चोपून काढला. फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि बिन्नी यांनी बळीदेखील घेतले; पण हरभजनसिंग हा कामगिरीत अपयशी ठरला. झिम्बाब्वेकडून चामू चिभाभा आणि डोनाल्ड त्रिपानो यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले होते; पण दुसऱ्या सामन्यात या दोघांवरही वर्चस्व गाजविण्याचे आव्हान भारतीय फलंदाजांना स्वीकारावे लागेल. रायुडूने फलंदाजांना अनुकूल वातावरण असल्याने नाणेफेक जिंकतच फलंदाजी करण्याचे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था) भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजनसिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, संदीप शर्मा आणि मोहित शर्मा.झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा, चामू चिभाभा, ग्रीम क्रेमर, नेव्हिले मेजिवा, हॅमिल्टन मस्कद्जा, रिचमंड मुतुंबामी, तिनाशे पेंगियांगरा, सिकंदर रझा, डोनाल्ड त्रिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विलियम्स. सामन्याची वेळ : दुपारी १२.३० पासून
मालिका विजयाचा इरादा
By admin | Published: July 12, 2015 4:03 AM