ऑनलाइन लोकमत
ग्रॉस आइसलेट, दि. 11 - गल्लीबोळात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये बऱ्याचदा स्टंप्स, बेल्सशिवाय खेळ खेळला जातो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळवल्या गेलेल्या एखाद्या सामन्यात बेल्सशिवाय खेळ खेळला गेला, असे सांगितले तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सामन्यात अपरिहार्य कारणामुळे बेल्सशिवाय खेळ खेळावा लागला.
9 जून रोजी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात ग्रॉस आइसलेट येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात असा प्रसंग ओढवला. त्याचे झाले काय की, सामना सुरू असताना वेगाने वारा वाहू लागला. या वाऱ्यामुळे बेल्सच काय स्टंप्म्ससुद्धा पडू लागले. त्यामुळे पंचांनी बेल्सशिवाय खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तानच्या डावातील 20 व्या षटकात वेस्ट इंडिजचा गोलंदाज अल्झारी जोसेफ गोलंदाजी करत होता. त्यावेळी जोरदार वाऱ्यामुळे बेल्स पडल्या. त्यानंतर पंचांनी बेल्सशिवाय खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या संपूर्ण षटकात बेल्सशिवाय खेळ खेळला गेला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमांनुसार पंचांची परवानगी आणि दोन्ही कर्णधारांच्या सहमतीने बेल्सशिवाय खेळ खेळला जाऊ शकतो. दरम्यान या सामन्यात अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजवर 63 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा युवा लेगस्पिनर रशिद खान याने 18 धावांत सात बळी टिपले.