मुंबई : तामिळनाडूचा इंटरनॅशनल मास्टर विसाख एन. आर. याने सर्वाधिक ८ गुणांसह नवव्या मुंबई महापौर खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत वर्चस्व राखत शानदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या स्पर्धेत भारतीय खेळाडूने बाजी मारली. वांद्रे येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षीय विसाखने आपल्या वयाच्या तुलनेत अधिक परिपक्व खेळ केलो. अंतिम फेरीत त्याने ग्रँडमास्टर दिपतयान घोषला बरोबरीत रोखून ८ गुणांसह बाजी मारली. यावेळी प्रत्येकी ८ गुणांसह विसाख व चंडिगडच्या गुसैन हिमल यांनी संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. मात्र दिपतयानला बरोबरीत रोखल्याच्या जोरावर आर्बिटर्सनी विसाखला विजयी घोषित केले. गुसैनने अंतिम फेरीत इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीला नमवून ८ गुणांची कमाई केली होती. विसाख आणि दिपतयान यांच्यातील लढतीला वझीराच्या इंडियन डिफेन्सने सुरुवात झाली, तर पुढे या लढतीत डच डिफेन्सचा प्रभाव दिसून आला. नवव्या चालीवर दिपतयानने आपल्या प्यादाचा बळी देऊन आक्रमक खेळाचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही नंतर अतिरीक्त धोका न पत्करताना केवळ १६व्या चालीमध्येच बरोबरी मान्य केली. (क्रीडा प्रतिनिधी)
इंटरनॅशनल मास्टर विसाखचे ऐतिहासिक विजेतेपद
By admin | Published: June 10, 2016 3:36 AM