पुणे - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तान विरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे. आयओसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत झालेल्या चर्चेनंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याविरोधात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली होती. आयओसीकडून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ''भारतीय एनओसी, आयओसी आणि आयएसएसएफने अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र तरीही पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही मार्ग निघू शकला नाही. ही परिस्थिती कुठल्याही प्रकराचा भेदभाव न करण्याच्या आयओसीच्या मूळ चार्टरच्या विरोधात जाणारी आहे. कुठल्याही स्पर्धेच्या यजमान देशात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना निपक्षपातीपणे आणि समानतेच्या वातावरणात खेळण्याची संधी मिळावी यासाठी, आयओए कटिबद्ध आहे."असे या पत्रकात म्हटले आहे.
''आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारतात यापुढे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला स्थगिती देत आहे. जोपर्यंत भारत सरकारकडून ऑलिम्पिक चार्टरचे पालन होण्याबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील,'' असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.