मुंबई : मला डावलून निवड समितीने संघ निवडला आहे, असा दावा एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत हा आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळला होता. या स्पर्धेमधून अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी संघ निवडला जातो. पण या आंतरराष्ट्रीय खेळाडूला अखिल भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाची टग ऑफ वॉर (रस्सीखेच) या खेळाची स्पर्धा झाली. या स्पर्धेत रोहित ठोगल्ला हा आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये योग्यपद्धतीने निवड करण्यात आली नाही, असा दावा रोहितने केला आहे.
याबाबत रोहित म्हणाला की, " या स्पर्धेचा निकाल लावताना निवड समितीने मला डावलले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्णपदकाची कमाई केली होती. सध्याच्या घडीला मी अव्वल दर्जाचा अँकर आहे. त्यामुळे या स्पर्धेतून माझी निवड होणे अपेक्षित होते. पण तसे घडले मात्र नाही. या स्पर्धेमध्ये खेळाडूचा स्तर आणि त्याची कामगिरी या दोन गोष्टी पाहायला जातात. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. माझी कामगिरीही चांगली झाली आहे. त्यामुळे माझी निवड न झाल्याने मला हा मोठा धक्का आहे."
याबाबत आम्ही या स्पर्धेच्या निवड समितीचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांच्याशीही संपर्क साधला. याविषयाबाबत म्हात्रे म्हणाले की, " आम्ही निवड समितीने एकमताने चर्चा करून हा संघ निवडला आहे. या स्पर्धेत खेळाडूंची कामगिरी कशी होती, या गोष्टीच्या जोरावरच आम्ही अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली आहे. त्याबरोबर संघाचे वजन 640 किलो एवढे असावे लागते, यामध्ये संतुलन राखणे ही मोठी कसोटी असते. त्यामुळे एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू जरी असला तरी त्याची कामगिरी कशी झाली आणि तो वजनाच्या कसोटीमध्ये बसतो का, हे पाहणे महत्वाचे असते. मीदेखील एक प्रशिक्षक आहे. माझ्या संघातील खेळाडूंना ही बऱ्याच वेळेला निवडले गेले नाही, त्यासाठी माझ्या खेळाडूंवर अन्याय झाले असे मी कधीही म्हटले नाही."
याबाबत मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मोहन अम्रुळे म्हणाले की, " मुंबई विद्यापीठ निवड समितीची स्थापना करते. या समितीमध्ये तज्ञही असतात, त्याचबरोबर संघटनेचे सदस्यही असतात. निवड समिती खेळाडूंच्या नावांची आम्हाला शिफारस करते. त्यामुळे संघ निवडीमध्ये आम्हाला काहीही अधिकार नसतो. निवड समिती जे आम्हाला सांगेल, त्याचे आम्ही पालन करत असतो. त्यामुळे हा विषय निवड समितीच्या अखत्यारीत येतो."