ब्लॅक अँड व्हाइट जमान्यात प्रदर्शित झालेल्या 'हम हिंदुस्तानी' या चित्रपटातील "छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी..." हे मुकेश यांचं गाणं आठवतंय का? उमा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल देशभक्तीची भावना अन् नव्या भारताचं नवं स्वप्न दाखवणारे आहे. आता तुम्ही म्हणाल, आज ना १५ ऑगस्ट... ना २६ जानेवारी, मग ८ मार्चला हे गाणं वाजवण्याचं किंवा आठवण्याचं लॉजिक काय? त्यामागची गोष्ट अशी की, खेळाचं मैदान गाजवून देशाला अभिमानास्पद क्षणाची अनुभूती देणाऱ्या अन् जगात भारी ठरलेल्या महिला खेळाडूंना सेल्यूट करण्यासाठी हे गाण एकदम परफेक्ट वाटतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या साऱ्याजणींनी "पुरानी ज़ंजीरों को तोड़...."
पीटी उषा, कर्णम मलेश्वरी यांनी खेळाच्या मैदानात सेट केलेली प्रेरणादायी स्टोरी. बॉक्सिंगच्या रिंगमधील सुपर मॉम मेरी कोम, क्रिकेटच्या मैदानातील मिताली राज आणि 'फुलराणी' सायनाच्या पावलावर पाऊल ठेवत बॅडमिंटनच्या कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या पीव्ही सिंधूसह ऑलिम्पिकमध्ये अचूक वेध घेणारी मनू यासारख्या अन्य साऱ्या जणींनी मिळून "पुरानी ज़ंजीरों को तोड़" नवा इतिहास रचून देशाला अभिमानास्पद क्षणांची अनुभूती दिली. खेळाचं मैदान गाजवणाऱ्या महिला खेळाडूंनी "छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी..' या गाण्यातील बोल फॉलो करत 'हम हिंदुस्तानी' जगात भारी हे गाणं वाजवलंय, असं वाटतं. महिला दिनाच्या निमित्तानं खेळाचं मैदान गाजवून जगात भारी ठरलेल्या त्या साऱ्या जणींना मानाचा मुजरा!
पीटी उषाची प्रेरणादायी स्टोरी महिला क्रीडा क्षेत्राला बूस्ट देणारी
क्रिकेट म्हटलं, की जसं सचिन तेंडुलकरशिवाय पुढे जाता येत नाही, अगदी तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रात महिलांच्या कामगिरीचा विचार करताना पीटी उषा हे नाव सर्वात आधी लक्षात येते. १९७६ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी शालेय स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत जिंकलेले पदक ते १९८४ मध्ये ऑलिम्पिकमध्ये धावणारी पहिली भारतीय महिला धावपटू या पीटी उषा यांच्या प्रेरणादायी स्टोरीनं देशातील मुलींना एक बूस्ट दिला. ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली, पण या चेहऱ्यामुळे अनेक जणी खेळाच्या मैदानात उतरल्या अन् जगाच्या मानाच्या स्पर्धेत मग मेडलही आलं.
कर्णम मल्लेश्वरी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला
कर्णम मलेश्वरी ही जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. २००० साली वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळवून या महिला खेळाडूनं भारताच्या नारीशक्तीची झलक जगाला दाखवली होती. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन सुवर्ण पदकांसह भारतीय महिला क्रीडा क्षेत्रालाही सोन्याचे दिवस येतील, याचे संकेत दिले होते.
महिला क्रिकेटमध्ये मिताली राजची हवा
सध्याच्या घडीला क्रिकेट क्षेत्रात टीम इंडियाचा बोलबाला आहे. क्रिकेट धर्म झाला अन् क्रिकेट चाहत्यांनी सचिनला देव केलं. मग महिला क्रिकेटमध्ये मिताली राजची हवा दिसली अन् तिला 'लेडी सचिन'चा टॅग लागला. भारतीय महिला संघ क्रिकेटमध्ये अजूनही वर्ल्ड चॅम्पियन्स झालेला नाही. पण मिताली राजनं आपली कारकिर्द गाजवताना अनेक वर्ल्ड रेकॉर्ड रचत भारतीय महिला संघ इथंही फार काळ मागे राहणार नाही, याचे संकेत दिले.
सायनानं ती भीती दूर केली, मग सिंधूनं तीच संस्कृती जपली
बॅडमिंटन कोर्टमध्ये मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरिया या देशातील खेळाडूंचा दबदबा होता. बॅडमिंटनच्या कोर्टवर या देशातील खेळाडूंनी एक दहशतच निर्माण केली होती. पण सायना नेहवाल आली, लढली, जिंकली आणि तिने ही भीती दूर केली. आम्हीही कमी नाही हे दाखवून देत ती 'फुलराणी' झाली अन् तिच्या पावलावर पाऊल टाकत पीव्ही सिंधूनं कोर्टवर बोलबाला करण्याची संस्कृती जपली. दोघींनी देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकत महिला बॅडमिंटनचा जगात बोलबाला दाखवून दिलाय.
'खेलरत्न' मनु भाकर!
मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. एकाच हंगामात दोन पदकं जिंकण्याची कामगिरी करून तिने नव्या जमान्यात खेळातील दिवानगी एका वेगळ्या उंचीवर पोहचली आहे, हे दाखवून दिले. ऑलिम्पिकमधील दिमाखदार कामगिरीच्या जोरावर तिला भारत सरकारकडून 'खेलरत्न' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.