कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे, रवी शास्त्री आणि संदीप पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांची मुलाखत मंगळवारी येथील एका हॉटेलमध्ये घेण्यात येणार आहे.बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर हे मंगळवारी निवडण्यात आलेल्या २१ उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत. तेंडुलकर व्हिडिओ कॉनफरन्सच्या माध्यमातून यात सहभागी होणार आहे. बंगाल क्रिकेट संघटनेच्या एका सिनिअर पदाधिकाऱ्याने दुजोरा देताना सर्व उमेदवारांची मुलाखत मंगळवारी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिकारी म्हणाला,‘‘तीन दिग्गज नावांचाही यात समावेश अहे. संजय जगदाळेतर्फे आयोजित बैठकीला दीड वाजता प्रारंभ होणार आहे.’’शास्त्री, कुंबळे व पाटील यांच्याव्यतिरिक्त विक्रम राठोड, प्रवीण आम्रे, बलविंदर संधू आणि व्यंकटेश प्रसाद प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. सल्लागार समितीच्या सूचना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पाठविण्यात येईल आणि २४ जून रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या कार्यसमितीच्या बैठकीत याला मंजुरी प्रदान करण्यात येईल. कुंबळे सर्व निकष पूर्ण करीत नाहीत. कारण त्यांना अद्याप कुठल्या आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणी संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही किंवा त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कुठला कोर्स केलेला नाही. दरम्यान, २०१३ आणि २०१५ मध्ये आयपीएलमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचे ते मेंटर होते. (वृत्तसंस्था)
कुंबळे, शास्त्री, पाटील यांची मुलाखत आज
By admin | Published: June 21, 2016 2:12 AM