नवी दिल्ली : आपल्यावर लाच घेतल्याचा खोटा आळ घेऊन न्यायालयात खेचण्याची धमकी दिल्यामुळे आपली प्रतिमा डागाळण्यात हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा हे जबाबदार असल्याचे सांगून भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे प्रमुख एन. रामचंद्रन यांनी बत्रा यांच्यावर दहा कोटी रुपयांचा दावा केला. या आशयाची नोटीसही त्यांनी बजावली आहे.बत्रा यांनी गेल्या वर्षी आयओए निवडणुकीच्या वेळी, ‘रामचंद्रन यांनी मध्यस्थामार्फत आपल्या उमेदवारीला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात दर वर्षी एक कोटी रुपये देण्याची शिफारस केली होती,’ असा दावा केला होता. बत्रा यांचे हे आरोप बिनबुडाचे आणि खोटारडे असल्याचे सांगून आपली प्रतिमा मलिन करण्याच्या मोबदल्यात पुढील १५ दिवसांत दहा कोटी रुपयांसह विनाअट माफी मागून आरोप मागे घेण्याची मागणी रामचंद्रन यांनी केली. असे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचीदेखील धमकी दिली आहे.रामचंद्रन यांचे वकील हरिशंकर मानी यांनी बत्रा यांना पाठविलेल्या पत्रात, ‘आपले आरोप चुकीचे, तथ्यहीन आणि समाजातील प्रतिष्ठित संस्थेची प्रतिमा डागाळेल, असे आहेत. आयओए, आयओसी, क्रीडा विश्व तसेच प्रशासकांच्या नजरेत माझ्या अशिलाची प्रतिमा आपण खराब करण्याचा प्रयत्न केला,’ असे लिहिले आहे. मनी म्हणाले, ‘‘बत्रा यांनी नुकसानभरपाई न दिल्यास माझे अशील दिवाणी आणि फौजदारी कायद्यानुसार कारवाई सुरू करतील.’’बत्रा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, ‘‘रामचंद्रन यांच्या मागण्या मला मान्य नाहीत; शिवाय आयओए प्रमुखाविरुद्ध मी न्यायालयात दाद मागणार आहे. रामचंद्रन यांनी नोटीस पाठविली याचा मला आनंद झाला. माझे वकील उत्तर देतील; पण कुठल्याही स्थितीत माफी मागणार नाही. त्यांनी न्यायालयात जायचे, तर खुशाल जावे. तेथेच त्यांना उत्तर देईन.’’(वृत्तसंस्था)
आयओएप्रमुखांचा बत्रांवर दहा कोटींचा दावा
By admin | Published: June 24, 2015 12:55 AM