रिओ दि जानेरो, दि. १८ - रिओ आॅलिम्पिकमध्ये अवैधरीत्या तिकिट विक्रीप्रकाणी ब्राझीलच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती कार्यकारी बोर्डचे सदस्य आणि आयर्लंडच्या आॅलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष पॅट्रीक हिकी यांना बुधवारी अटक केली. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, त्यांना ७१ वर्षीय हिकी यांच्याविरुध्द ठोस पुरावे सापडले आहेत. हिकी यांना ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमधून अटक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार हिकी यांनी रिओ ओलिम्पिक तिकिट आणि आंतरराष्ट्रीय पासेसची निर्धारीत किमतींपेक्षा अधिक किमतीमध्ये विक्री केली. विशेष म्हणजे यूरोपियन आॅलिम्पिक समितीचेही अध्यक्ष असलेल्या हिकी यांना अटक केल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. तरी, त्यांना रुग्णालयात का नेण्यात आले, हे अद्याप कळाले नाही. आयओसीचे प्रवक्ता मार्क अॅडम्स यांनी याबाबत सांगितले की, ‘‘थोड थांबा, प्रतीक्षा करा. हिकी यांच्यावर नेमका कोणता आरोप आहे याची आम्हालाही पुर्ण कल्पना नाही. व्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्वास आहे. प्रत्येक व्यक्ती आरोप सिध्द होण्याआधी निर्दोष असतो.’’ त्याचवेळी, हिकी यांच्यावरील आरोप एक हजार तिकिंटांबाबतीत असून याविषयी पोलिसांनी अन्य कोणत्याही आयओसी अधिकारीसोबत तपासणी केली नाही, असेही अॅडम्स यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)