आॅनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर आज रात्री आठ वाजता अनुभवहीन दिल्ली डेअरडेविल्सचे दिग्गजांचा भरणा असलेल्या पुणे सुपरजायंट्ससमोर आव्हान आहे. दिल्लीच्या दृष्टीने औपचारिकता असलेल्या या सामन्यात पुण्याचा संघ मात्र विजयासह गुणतक्त्यात आणखी वरचे स्थान गाठण्यास उत्सुक आहे. पुणे सुपरजायंट्सचा संघ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे. १२ सामन्यात ८ विजयांसह पुण्याने १६ गुणांची कमाई केली आहे. मागच्या ८ पैकी सात सामन्यात विजय मिळवणाऱ्या पुणे संघाला रोखणे हे दिल्लीला सोपे नाही. मात्र या स्पर्धेतील उर्वरीत सामने जिंकून निरोप घेण्यासाठी दिल्लीचे फलंदाज प्रयत्नशील आहे. दिल्लीच्या संघाकडे गुणवत्तेची कमी नाही. मात्र दिल्लीचे युवा फलंदाज नेहमीच अनुभवात कमी पडतात. संजू सॅमसन, रिषभ पंत, करुण नायर, श्रेयश अय्यर हे फलंदाज कोणत्याही मोठ्या धावसंख्येला गवसणी घालण्यास सक्षम आहेत. मात्र एक मोठी खेळी केल्यावर पुढच्या दोन सामन्यात अपयशी ठरत असल्याने दिल्लीला प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले. ९३ धावांची मोठी खेळी केल्यावर पुढच्या दोन्ही सामन्यात रिषभ पंतला दुहेरी आकडा गाठता आला नाही. गुजरात लायन्स विरोधात तर त्याचे धावबाद होणे हे अनुभवाचीच कमतरता असल्याचे दिसून आले.दिल्लीची गोलंदाजी अनुभवी आहे. जहीर, शमी हे दमदार गोलंदाज आहेत. त्यांच्या सोबतीला अमित मिश्रा, पॅट कमिन्स, कासिगो रबाडा हे देखील संघाच्या गोलंदाजीला मजबुती देतात.पुण्याच्या गोलंदाजीचा विचार करता जयदेव उनाडकटकडे दिल्लीच्या फलंदाजांनी विशेष गांभिर्याने पाहिले पाहिजे. टी २० मधील सर्वात अप्रतिम षटक टाकण्याचा मान जयदेवकडे आहे. त्याने गेल्या सामन्यात सनरायजर्स विरोधात अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक घेत निर्धाव टाकले होते. त्याच्या जोडीला फिरकीपटू इम्रान ताहीरही आहे. वॉशिंग्टन सुंदर, बेन स्टोक्स यांचा माराहीभेदक आहे. मात्र शार्दुल ठाकूर आणि डॅनियल ख्रिस्तीयन यांना लय मिळवावी लागेल. फलंदाजीचा विचार करता राहुल त्रिपाठी सोबतच अजिंक्य रहाणे याला देखील धावा काढाव्या लागतील. या सत्रात त्याला एकदाच अर्धशतक झळकावता आले आहे.त्याने २०.६६ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. या सामन्यातील विजयाने पुणे दुसऱ्या स्थानावर पोहचेल. त्याचा फायदा त्यांना क्वालिफायर १ मध्ये पोहचण्यास होईल. कर्णधार स्टिव्ह स्मिथ, महेंद्रसिंह धोनी, बेन स्टोक्स यासोबतच अष्टपैलु मनोज तिवारी यांना देखील धावा काढाव्या लागतील.