आॅनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 05 - किंग्ज इलेव्हन पंजाबने प्ले आॅफच्या प्रवेशासाठी धडपड करत आहे. त्यांच्यासमोर आज आव्हान आहे ते तळाच्या स्थानावर असलेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरूचे. आरसीबीच्या होम ग्राउंडवर थोड्याच वेळात होत असलेल्या सामन्यात विराटसेना पंजाबसमोर आव्हान उभे करते का हे पाहणेच महत्त्वाचे ठरेल. आरसीबी या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मात्र उरलेले सामने जिंकून विराट या स्पर्धेतून काही चांगल्या आठवणी घेऊन जाऊ इच्छित असेल. आरपीएस विरोधातील सामन्यात काही फरकाने विजय हुकला आणि या गेल्या वेळच्या उपविजेत्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पंजाबची स्थिती तळ््यात मळ््यात आहे. ९ सामन्यात पंजाबचे ८ गुण असले. तरी चौथ्या स्थानावर असलेल्या हैदराबादचे १३ गुण आहेत. त्यामुळे प्ले आॅफ गाठण्यासाठी पंजाबला उर्वरीत सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. त्यातच काल झालेल्या सामन्यात दिल्लीने प्लेआॅफच्या आशांना विजयासह बळ दिले. हे पंजाबला विसरून चालणार नाही. विराटच्या सेनेत डिव्हिलियर्स, जाधव, गेल यांच्यासारखे स्फोटक फलंदाज आहेत त्यासोबतच चहल, अनिकेत चौधरी यांच्यासारखे दमदार गोलंदाज देखील आहेत. स्टुअर्ट बिन्नी संघाला आवश्यक असताना चांगली कामगिरी करतो. पवन नेगीने या स्पर्धेत आरसीबीकडून सर्वात फायदेशीर गोलंदाजी केली आहे. गरजेच्या वेळी प्रतिस्पर्धी संघाच्या धावा तो रोखू शकतो. तसेच बळी घेण्यातही मागे नाही. गेल्या स्पर्धेपेक्षा या स्पर्धेत त्याची कामगिरी नक्कीच सुधारली आहे. दिल्ली विरोधात मार्टिन गुप्टीलने केलेली खेळी विराट आणि आरसीबी संघ व्यवस्थापन नजरे आड करणार नाही. आमलाही चांगलाच फॉर्ममध्ये तो केव्हाही प्रतिस्पर्ध्याला नमोहराम करु शकतो. किंग्ज इलेव्हनचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल हा वादळ आहे. त्याचा दिवस असला की क्रिकेटच्या सर्व प्रकारात प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवण्यास सक्षम आहे.