ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने पुण्यावर 7 धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्याला निर्धारीत 20 षटकात फक्त सात बाद 161 धावा करता आल्या. पुण्याकडून मनोज तिवारी शेवटपर्यंत संघर्ष केला. त्याने सर्वाधिक 64 धावा केल्या. कर्णधार स्मिथने 38 आणि स्टोक्सने 33 धावा केल्या. पुण्याचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या दिल्ली डेअरडेविल्सने पुण्याला विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीने वीस षटकात 8 बाद 168 धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर करुण नायरने सर्वाधिक 64 धावा केल्या. ऋषभ पंतने 36 तर, सॅम्युल्सने 27 धावा केल्या.
दिल्लीच्या दृष्टीने औपचारिकता असलेल्या या सामन्यात पुण्याचा संघ मात्र विजयासह गुणतक्त्यात आणखी वरचे स्थान गाठण्यास उत्सुक आहे. पुणे सुपरजायंट्सचा संघ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे. १२ सामन्यात ८ विजयांसह पुण्याने १६ गुणांची कमाई केली आहे.