नवी दिल्ली : इंडियन प्रिमीयर लीगचे दहावे पर्व परदेशात होण्याविषयी आयपीएल संचालन परिषद विचारविमर्श करण्याची शक्यता असल्याचा खुलासा बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला.ठाकूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘आयपीएल संचालन परिषद भारत आणि परदेशातील स्थळांची पाहणी करणार आहे. आम्हाला स्थळांची उपलब्धता आणि तेथील सद्य:स्थिती पाहावी लागेल.’याआधी आयपीएल दोन वेळेस भारताबाहेर खेळविण्यात आली होती. या दोन्ही वेळेस त्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. २00९ चे आयपीएल पर्व दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आले होते. तसेच २0१४ मध्ये पहिल्या १५ दिवसांच्या लढती संयुक्त अरब अमिरात येथे खेळविण्यात आल्या होत्या. या मुद्द्यावर बीसीसीआयचे उच्च पदाधिकारी विचार करीत आहेत.बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी चार दिवसांपूर्वीच पहिले टिष्ट्वट केले होते, ‘जर असे होत असेल तर लवकरच आयपीएल देशाबाहेर खेळले जाऊ शकते.’आयपीएल सुरुवातीपासूनच एकानंतर एका वादात अडकत राहिले आहे; परंतु यावर्षी विविध संस्थांद्वारे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे आयपीएलचे वेळापत्रक बिघडले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे १२ आयपीएल सामने दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या बाहेर आयोजित करण्यात येणार आहेत. क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्ट्यांची निगराणी करण्यासाठी पाण्याचा खूप उपयोग केला जात असल्याचे एका जनहित याचिकेत दावा करण्यात आला होता.
‘आयपीएल १0’ पर्व परदेशात आयोजित ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 2:36 AM