ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 : इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने दहाव्या सत्रात मुंबई रणजी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला आपल्या चमूमध्ये घेतले आहे. पाच एप्रिल ते २१ मेदरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात शार्दुलला आपल्या संघात स्थान दिले आहे. शार्दूल ठाकूर याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होता. शार्दूल ठाकूरला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून पुणे सुपरजायंट्सनी विकत घेतलं. किंग्ज इलेव्हन पंजाबने शार्दूल ठाकूरला 2014 मध्ये आयपीएल खेळाडूंच्या लिलावात खरेदी केले होते. आरपीएसने याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज मयंक अग्रवाललादेखील संघात घेतले आहे.शार्दुलने सलग दोन रणजी मोसमात चमकदार कामगिरीसह सर्वांचे लक्ष वेधले. 2014-15 साली त्याने 48 बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते. तर यानंतर 2015-16 मोसमात शादुलने 41 बळी घेत मुंबईला 41व्यांदा रणजी चॅम्पियन बनविण्यात मोलाचे योगदान दिले. शार्दुलने 37 प्रथम श्रेणी सामन्यांत 133 बळी मिळवले आहेत.इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी पार पडला. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. आरपीएसचा संघ पुढीलप्रमाणे : महेंद्र सिंह धोनी, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, रविचंद्रन अश्विन, फाफ डू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, अॅडम जंपा, अंकित शर्मा, अंकुश बेन्स, अशोक डिंडा, बाबा अपराजित, बेन स्टोक्स, डॅनियल क्रिस्टियन, दीपक चाहर, ईश्वर पांडे, जसकरण सिंह, जयदेव उनाडकट, लोकी फर्ग्युसन, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मिलिंद टंडन, राहुल अजय त्रिपाठी, राहुल चाहर, रजत भाटिया, सौरभ कुमार आणि उस्मान ख्वाजा.