- ऑनलाइन लोकमत
रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध या सत्रातील आपली पराभवाची मालिका खंडित करण्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा अपयश आले. क्वालिफायर १ च्या लढतीत पुणे संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो वॉशिंग्टन सुंदर. त्याने रोहित शर्मा, अंबाती रायडू आणि किरेन पोलार्ड यांना बाद करत मुंबईची फलंदाजीच खिळखिळी करून टाकली. पुण्याच्या फलंदाजी सुरूवातही तशी फारशी चांगली झाली नव्हती. राहूल त्रिपाठी आणि स्मिथ झटपट बाद झाले. मात्र अजिंक्य रहाणेने आपल्या घरच्या मैदानावर मुंबईकर चाहत्यांना निराश केले नाही. त्याने या सत्रातले दुसरे अर्धशतक झळकावतांना पुण्याच्या डावाला आकार दिला. त्याला मनोज तिवारीची चांगली साथ लाभली. मात्र संघाची धावगती सहाच्या आसपासच होती. पुण्याच्या पॉवर प्लेमध्ये फक्त ३३ धावाच करता आल्या होत्या. अखेरच्या षटकांत धोनीने आपल्या स्टाईलने षटकारांची बरसात करत संघाला १६२ चा आकडा गाठून दिला. त्याने ४० पैकी ३० धावा फक्त षटकारांनी वसूल केल्या. धोनीने या सामन्यात ५ षटकार लगावले. त्याने या सत्रात एका सामन्यात लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. धोनीने २०११ मध्ये आरसीबी विरोधात एका सामन्यात सहा षटकार लगावले होते. ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. मनोज तिवारीने या सामन्यात संयमी खेळ केला. मात्र त्याने या सत्रात सर्वाधिक चेंडू खेळून अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. तर रहाणेने या सत्रात केलेल्या तीन सर्वोच्च खेळी या मुंबई विरोधातच आहे. सलामीच्या सामन्यात रहाणेने मुंबई विरोधात ६० धावा केल्या होत्या. मुंबई विरोधातील दुसऱ्या सामन्यातही त्याने ४६ धावा आणि आता क्वालिफायर सामन्यात त्याने ५४ धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर प्रमाणेच शार्दुल ठाकूर याने तीन गडी बाद केले. लेंडल सिमन्स हा ठाकूरच्या प्रसंगावधाचा बळी ठरला. पार्थिवने फटकावलेल्या चेंडूला नॉनस्ट्रायकर एंडच्या बाजुला जाण्यासाठी त्याने तातडीने स्पर्श केला. चेंडू सरळ स्टम्पवर जाऊन आदळला. दुर्देवी सिमन्स मात्र क्रिजच्या बाहेर निघून गेला होता.
जंटलमन रहाणे१९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मॅक्लेघनने सीमा रेषेला चेंडू फटकावला. रहाणेने चपळतेने चेंडू हाती पकडला. मात्र आपण सीमा रेषा ओलंडणार हे लक्षात येताच लगेचच डीप मिडविकेटकडून धावत येणाऱ्या स्मिथच्या दिशेने भिरकावला. स्मिथनेही चेंडू झेलला. मात्र हे करत असतानाच रहाणेचा पाय सीमा रेषेला लागला होता. स्मिथने बादचे अपीलही केले. मात्र रहाणेने तात्काळ आपला पाय लागल्याचा इशारा केला. पंचानी तिसऱ्या टीव्ही पंचाची मदत घेतली. त्यात रहाणेचा पाय लागल्याचे स्पष्ट झाले.