ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 6 - पुणे सुपरजायंट्सचा विजयी रथ रोखणं सनरायझर्स हैदराबादला शक्य झालं नसून पुण्याने विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. पुण्याने 12 धावांनी हैदराबादचा पराभव केला. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 8 विकेट्स गमावत 148 धावा केल्या असून हैदराबादसमोर विजयासाठी 149 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आव्हान माफक असल्याने हैदराबादचा सहज विजय मिळवणं शक्य होईल असं वाटत होतं. मात्र पुण्याचा विजयी रथ रोखणं त्यांना शक्य झालं नाही.
कर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. युवराज सिंगसोबत झालेल्या चांगल्या भागीदारीनंतर हा सामना जिंकण जास्त अवघड जाणार नाही असं वाटत असताना विकेट्स पडणे सुरु झाले. शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज असताना जयदेव उनाढकटची हॅट्ट्रीक घेत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं.
हैदराबादने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्णय सार्थ ठरवत दुस-याच ओव्हरमध्ये राहुल त्रिपाठी रन आऊट झाला आणि हैदराबादने पहिली विकेट मिळवली. गेल्या सामन्यात आपल्या तुफान फटकेबाजीमुळे चर्चेत आलेला राहुल त्रिपाठी पुन्हा एकदा असा काही पराक्रम करेल असं वाटत होतं. पण त्याला अपयश आलं आणि स्वस्तात बाद झाला. तो चार चेंडूत फक्त एक धाव करु शकला. स्टीव्ह स्मिथही स्वस्तात बाद झाला असता, मात्र त्याला दोन वेळा जीवनदान मिळाले.
स्टीव्ह स्मिथला मिळालेल्या जीवनदानाचा तसा हैदराबादला काही तोटा झाला नाही. स्मिथने 39 चेंडूत फक्त 34 धावा केल्या. स्टोक्सने आक्रमक खेळीला सुरुवात केली होती. त्याने 25 चेंडूत 39 धावा केल्या. राशीद खानने त्याची विकेट घेत माघारी धाडलं. शेवटच्या ओव्हर्समध्ये धोनीने आपल्या स्टाईलप्रमाणे तुफानी फटकेबाजी केली. पण नेमक्या शेवटच्या ओव्हरला त्याची विकेट गेली. त्याने 21 चेंडूत 31 धावा केल्या.