आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - ४ मे रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर गुजरात लायन्स विरुद्ध दिल्ली डेअर डेविल्सचा सामना हा या सत्रातील उत्तम सामना होता. गुजरातच्या फलंदाजांनी २०९ धावांचे आव्हान दिले असतानाही दिल्लीच्या संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांनी तुफानी फटकेबाजी करत हे आव्हानही छोटे करून दाखवले होते. हेच दोन्ही संघ आज रात्रा आठ वाजता कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर लढणार आहेत. आयपीएल १० च्या प्ले आॅफच्या शर्यतीतून हे दोन्ही संघ आधीच बाहेर फेकले गेले आहेत. दोन्ही संघ ८ गुणांसह तळाच्या स्थानांवर आहेत. असे असले तरी दोन्ही संघाचे चाहते आता या सामन्याची वाट पाहत असतील. दोन्ही संघांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या फटकेबाजीची अपेक्षा असेल. गुजरात संघाचा विचार केला तर फलंदाजी मजबूत आहे. मात्र गोलंदाजी कमकुवत ठरते. जाडेजासारखा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला गोलंदाज असूनही रैना त्याचा वापर योग्य पद्धतीने करु शकलेला नाही. जाडेजाने वेळोवेळी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र पूर्ण चार षटके गोलंदाजी करण्याची संधी त्याला क्वचितच मिळाली आहे. गुजरातच्या गोलंदाजी मदार फॉकनर आणि थम्पी यांच्यावर आहे. मात्र त्यांच्या मर्यादा दिल्लीच्या युवा खेळाडूंनीच उघड केल्या होत्या. गुजरातचा कर्णधार रैना चांगला अष्टपैलु खेळाडू आहे. तो पार्टटाईम गोलंदाज असूनही जाडेजा आधी गोलंदाजी करतो. त्याचा फटका संघाला बसल्याचे या स्पर्धेत दिसले आहे. दिल्ली फलंदाजी ही तशी अनुभवी नाही. त्याचा फटका त्यांना संपूर्ण स्पर्धेत बसला. रिषभ पंत, करुण नायर, संजू सॅमसन,श्रेयस अय्यर यांच्यावर दिल्लीची फलंदाजी अवलंबून आहे. रिषभ आणि संजूने गुजरातच्या विरोधात तुफानी खेळीी केली असली तर त्यानंतर मुंबईविरोधातील सामन्यात दोघांनाही भोपळा फोडता आला नव्हता. अनुभवाच्या नावे अष्टपैलु कोरी अँडरसन, मार्लोन सॅम्युअल्स आहेत. गोलंदाजी अनुभवी असली तरी त्यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीला मिळालेला नाही. या सामन्यात जहीर आणि शमी गुजरातच्या फलंदाजांना त्रस्त करु शकतात. अमित मिश्रा गुजरातची फिरकी घेऊ शकतो. मात्र या आधी कोणत्याही सामन्यात तसे झालेले नाही. या सामन्यात कोणताही संघ विजयी झाला तरी त्याचा परिणाम आयपीएल १० च्या गुणतक्त्यात होऊ शकणार नाही. दोन्ही संघ आधीच स्पर्धेबाहेर पडले आहेत. पण स्पर्धेतून बाहेर पडताना किमान विजयी निरोप घ्यावा, अशी दोन्ही संघांची इच्छा असेल.