टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला ( Neeraj Chopra) IPL मधील फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) १ कोटी रुपयांचं बक्षीस आणि खास जर्सी गिफ्ट म्हणून दिली. नीरजनं टोकियोत भालाफेकीत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आणि २००८नंतरचे भारताचे ऑलिम्पिक स्पर्धेतील हे पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याहीपेक्षा १२५ वर्षांच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. त्यामुळेच नीरजवर बक्षिसांचा वर्षाव झाला. शनिवारी उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी नीरजला स्पेशल गाडी गिफ्ट केली आणि आज CSKनं १ कोटींसह त्याच्यासाठी बनवलेली खास जर्सी भेट म्हणून दिली.
नीरजनं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर CSKनं भालाफेकपटूचा गौरव करणार असल्याची घोषणा केली होती आणि आज त्यांनी तो शब्द पाळला. CSKनं नीरजसाठी तयार केलेल्या खास जर्सीवर ८७५८ हा क्रमांक लिहिला आहे. नीरजनं ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळेच CSKनं जर्सीवर हा क्रमांक लिहिला. CSKचे सीईओ केएस विश्वनाथन म्हणाले की,''नीरजचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मैदानी स्पर्धेत पहिलं ऑलिम्पिक पदक तेही सुवर्ण जिंकून नीरजनं पुढील पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. ८७.५८ हा नंतर भारतीय क्रीडा इतिहासात अजरामर झाला आहे. ही जर्सी त्याला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.''