ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 10) यावेळी अनेक गोष्टींसाठी खास आहे. खेळाडूंना विकत घेण्यापासून ते संघांमध्ये करण्यात आलेले बदल यामुळे सर्वांचं लक्ष खेचून घेण्यास आयपीएल यशस्वी ठरलं आहे. असाच एक मोठा बदल भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल करिअरमध्ये झाला आहे. महेंद्रसिंग धोनी गुरुवारी पुणे संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो कर्णधार म्हणून नाही तर संघाचा खेळाडू म्हणून उतरताना दिसेल. यावेळी पुणे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथवर सोपवण्यात आली आहे.
धोनीने आतापर्यंत नऊ वेळा केलं संघाचं नेतृत्व -
आयपीएलच्या सुरुवातीच्या पर्वांमध्ये धोनी कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. सुरुवातीच्या आठ पर्वांमध्ये धोनी चेन्नई सुपरकिंग्जकडून कर्णधार म्हणून खेळला आहे. गेल्या पर्वात पुणे संघाची कमान त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. यावेळी रायजिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ करत आहे. त्यामुळे यावेळी धोनी संघाचा नेतृत्व करताना नाही तर स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
चेन्नई संघासोबत खेळताना पहिल्या आठ पर्वांमध्ये धोनीने उत्तम कप्तानी करत इतर संघांसमोर एक उदाहरण उभं केलं होतं. आपल्या उत्तम नेतृत्व कौशल्याने धोनीने संघाला यशाच्या शिखरावर नेलं होतं. दरवेळी धोनीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. दोन वेळा तर चेन्नई संघ चॅम्पिअन ठरला होता. तीन वेळा धोनीचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. 2015 मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सविरोधात अंतिम सामन्यात धोनीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याच्यावर टीका झाली होती. चेन्नईचा संघ त्या सामन्यात चांगली कामगिरी करु शकला नव्हता.
पुणे संघाला चॅम्पिअन बनवण्यात अपयशी -
धोनीकडे क्रिकेट विश्वातील एक यशस्वी कर्णधार म्हणून पाहिलं जातं. मात्र पुणे संघासोबत धोनी अपयशी ठरला असंच म्हणावं लागेल. पुणे संघाने गेल्या पर्वात 14 सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले होते. संघाकडे स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि डूप्लेसिससारखे स्टार खेळाडूदेखील असतानादेखील धोनी अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करु शकला नाही.
धोनीच्या चाहत्यांनी शतकाची प्रतिक्षा -
गेल्या पर्वात धोनीने 14 सामन्यांमध्ये 135.23 च्या स्ट्राईक रेटने 248 धावा केल्या. धोनीच्या संपुर्ण आयपीएलमधील रेकॉर्डला पाहायचं गेल्यास त्याने 39.40 ची सरासरी आणि 138.95 च्या स्ट्राईक रेटने 143 सामन्यात 3721 धावा केल्या आहेत. मात्र चाहत्यांना धोनीकडून शतक पाहायला मिळालेलं नाही. धोनी एक उत्तम मॅच फिनिशर असून जोरदार फटके लगावतो. मात्र आजपर्यंत तो शतक करु शकलेला नाही. या पर्वात तरी चाहत्यांची ही प्रतिक्षा संपेल अशी आशा आहे.