ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २४ - आयपीएलच्या महामुकाबल्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फायनलमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आयपीएलच्या आठव्या पर्वातील फायनल कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानात रंगत असून चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स हे संघ आमने सामने आहेत. दोनदा विजेतेपद पटकावणारा चेन्नई तिस-यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी इच्छूक असून मुंबईला दुस-यांदा विजेतेपद पटकावण्याचा मौका आहे.
मुंबईचा कर्णधार पुन्हा तळपणार?
इडन गार्डन्स मैदान कायमच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी लकी ठरले आहे.
याच मैदानावर त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली होती.
शिवाय यंदाच्या सत्रातील सलामीचा सामना कोलकाताविरुध्द याच मैदानावर खेळताना त्याने नाबाद ९८ धावांची खेळी खेळली होती. तरी देखील मुंबईला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
चेन्नईची यशाची टक्केवारी जास्त
१३१ आयपीएल इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत एकूण १३१ सामने खेळले असून ७९ सामन्यांत विजय मिळवताना ५० सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या संघाची यशाची टक्केवारी सर्वाधिक ६१.१५% अशी आहे.
१२५ दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सने एकूण १२५ सामने खेळताना ७२ सामन्यात बाजी मारताना ५३ सामन्यांत पराभव पत्करला आहे. मुंबईच्या विजयाची टक्केवारी ५७.६०% चेन्नई नंतर मुंबईची कामगिरी सर्वोत्तम आहे.