- सुनील गावस्कररंगतदार आंतरराष्ट्रीय सत्रानंतर आता प्रतीक्षा आहे जगातील सर्वात मोठी, आकर्षक आणि सर्वोत्तम टी-२० लीगची. जगभरात टी-२० लीग स्पर्धा होतात, पण आयपीएलला मात्र तोड नाही. आयपीएलचे हे दहावे पर्व आहे. त्यानंतर पुढील सत्रात नवे चक्र सुरू होईल. दरम्यान, टीका-टीपणी नंतरही आयपीएलची लोकप्रियता व रंगत सातत्याने वाढत आहे. यावेळी फलंदाजांच्या तुलनेत चांगल्या गोलंदाजांना करारबद्ध करण्यासाठी फ्रेन्चायजींमध्ये चुरस दिसून आली. याचे मुख्य कारण म्हणजे फ्रेन्चायजींना विजयामध्ये गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे कळले आहे. असा विचार करणारे अचूक नाहीत. कारण स्मिथ, गेल, कोहली, डिव्हिलियर्स, धोनी, वॉर्नर, रोहित शर्मा यांच्यासारख्या फलंदाजांना रोखणे जगातील अव्वल गोलंदाजांनाही कठीण भासत आहे. गोलंदाजांना छाप सोडण्यासाठी केवळ चार षटके असतात, पण फलंदाज मात्र २० षटके चमकदार कामगिरी करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारचे निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, पण खिशात पैसे असले म्हणजे आणि निर्णय घेण्याचा अधिकार असला म्हणजे चुकीचे निर्णयही योग्य असल्याचे वाटते. स्मिथ व मॅक्सवेल यांची कर्णधारपदी नियुक्ती करण्याचा निर्णय माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारा आहे. कारण गेल्या वर्षी स्टीव्ह स्मिथ व्यस्त आंतरराष्ट्रीय सत्रामुळे नववे सत्र अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला होता. त्यावेळी त्याचा संघ स्पर्धेत पिछाडीवर पडला होता आणि बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत माघारत असल्याचे दिसून येत होते. त्यावेळी स्मिथने फिजिओसोबत चर्चा करीत काही लढती शिल्लक असताना मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. पण, यावेळी मात्र कर्णधार म्हणून त्याला अखेरपर्यंत संघासोबत कायम राहावे लागेल. मॅक्सवेलचा विचार करता गेले सत्र त्याच्यासाठी विशेष चांगले नव्हते. त्याने केवळ उंचावरून फटके मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो फलंदाजी क्रमाबाबत समाधानी नव्हता. यावेळी कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे त्याची नाराजी दूर झाली असेल आणि त्याला पसंतीच्या क्रमांकावर फलंदाजी करता येईल. गेल्या मोसमात विराट कोहली व डेव्हिड वॉर्नर हिरो ठरले होते. या दोघांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर संघांना अंतिम फेरी गाठून दिली होती. यावेळीही या दोन संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळेल. टी-२० क्रिकेटमध्ये भाकीत वर्तविणे कठीण असते, पण गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी रंगत अधिक राहील, असे म्हणता येईल. उष्णता वाढत आहे, पण आयपीएलमध्ये नेहमी ‘गेलस्टॉर्म’चे वर्चस्व असते. (पीएमजी)
आयपीएल जगातील सर्वांत आकर्षक व रोमांचक लीग
By admin | Published: April 05, 2017 12:10 AM