ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.19 - क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या पर्वात आतापर्यंत आश्चर्यकारकरीत्या लेग स्पिनर्सनी वर्चस्व गाजविले. सुरुवातीच्या २० सामन्यांत या गोलंदाजांनी ३९ बळी घेतले आहेत. आतापर्यंतच्या आआयपीएलमधील सर्व सामन्यांवर नजर टाकल्यास सुरुवातीच्या २० सामन्यात लेग स्पिनर्सनी ३९ गडी बाद करणे ही मोठी कामगिरी ठरली. आॅफ स्पिनर्स, डावखुरे फिरकीपटू तसेच चायनामॅन गोलंदाजाची कामगिरी लक्षात घेतली तर त्यांनी ३७ गडी बाद केले. या पर्वात लेग स्पिनर्सनी अन्य फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत सर्वाधिक षटके गोलंदाजी केली आहे.
राशिदचे देखणे यश-
यंदा दहाव्या पर्वात युवा लेग स्पिनर राशिद खान हा सर्वाधिक चर्चेत आहे. अफगानिस्तानच्या या युवा लेगस्पिनरला आयपीएलमध्ये प्रथमच संधी मिळाली. हैदराबादचे प्रतिनिधित्व करीत त्याने आतापर्यंत पाच सामन्यात ९ गडी बाद केले. सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजांत तो दुस-या स्थानावर आहे. द.आफ्रिकेचा अनुभवी लेग स्पिनर इम्रान ताहिर याला आयपीएल लिलावात कुणीही
खरेदी करण्याची तयारी दर्शविली नव्हती. अखेर रायजिंग पुणे सुपरजायंट्स त्याला संघात घेतले. ताहिरने पाच सामन्यात ८ गडी बाद केले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा युवा लेगस्पिनर यजुवेंद्र चहल याने सहा सामन्यात ७ गडी बाद केले. बेंगळुरुकडून खेळणारा दुसरा गोलंदाज वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री याचे दोन सामन्यात पाच बळी असून त्यात हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्रा याने चार सामन्यात पाच गडी बाद केले आहेत.