ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - आजपासून आयपीएलच्या दहाव्या सत्राला सुरुवात होत आहे. त्यापुर्वीच अभिनेते ऋषी कपूर यांनी आयपीएलमध्ये पाक खेळाडूंना सहभागी करावे अशी मागणी केली आहे. काल रात्री त्यांनी ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडल आहे. ऋषी कपूर यांच्या त्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. आयपीएलमध्ये एकापेक्षा एक क्रिकेटपटू आहेत. अफगाणिस्तानचेही खेळाडू प्रथमच खेळणार आहेत. त्यामुळं पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही विचार व्हावा असं मला वाटतं. तरचं खरा सामना होईल. आपण मोठे लोक आहोत. कृपया विचार करा, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे. ऋषी कपूर यांच्या या मताचं काहींनी स्वागत केलं आहे. तर, पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ले व शहिदांचे दाखले देऊन काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यात बंदी घालण्यात आली होती. त्यावर वारंवार तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण भारत-पाकमधील परंपरागत वादामुळं पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळू देण्यास अनेक राजकीय पक्ष व संघटनांचा विरोध आहे. त्यामुळं आयोजकांनीही पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेपासून दूर ठेवलं आहे.