रवी शास्त्री लिहितात...गेल्या काही आठवड्यांमध्ये सतत प्रवास, हॉटेलच्या रूममध्ये ‘चेक इन व चेक आऊट’ करणे, उष्ण वातावरण आणि स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरील प्रेक्षकांची गर्दी याला सामोरे जावे लागले असले तरी मला काहीच थकवा आलेला नाही. कारण यंदाचे आयपीएलचे पर्व युवा खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ ठरले आहे. रोमांचक अंतिम लढतीमुळे एका शानदार स्पर्धेची सांगता झाली. अनेक युवा खेळाडू या व्यासपीठामुळे पुढे आले आणि योग्य दिशेने मार्गस्थ झाले. भविष्यात काही खेळाडू निश्चितच पुढेही जातील, असा विश्वास आहे. यंदा अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंनी या स्पर्धेत छाप सोडली. जवळजवळ चार दशकांपासून युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जात असलेल्या देशात बंदुकीच्या फैरी व बॉम्ब यांच्या सान्निध्यात वाढलेल्या या खेळाडूंनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवले. राशिद व नबी आपल्या देशातील लोकांसाठी प्रेरणास्रोत बनले. सुनील नरेनने सलामीवीर म्हणून श्वास रोखण्यास भाग पाडले. सरळ बॅटने मारलेले त्याचे फटके, पुढे सरसावत त्याचे आक्रमक फटके प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे समीकरण बिघडविण्यास कारणीभूत ठरले. दुसऱ्या कुठल्या संघाने याचा विचार केला नाही, हे विशेष. उदाहरण द्यायचे झाल्यास नमन ओझाचे देता येईल. पारंपरिक फलंदाजीचे चांगले उदाहरण म्हणजे हाशिम आमला व केन विल्यम्सन यांच्या फलंदाजीमध्ये दिसले. त्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:चा जम बसविताना खोऱ्याने धावा वसूल केल्या. स्टीव्ह स्मिथ क्षेत्ररक्षकांचे कडे भेदण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. ख्रिस गेल व एबी डिव्हिलियर्स यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. एम. एस. धोनी व विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना फॉर्मात बघण्याचे सुख आपल्याला अनुभवता आले नाही. युवराजबाबतही असेच म्हणता येईल. प्रदीर्घ कालावधीच्या सत्रात काही भारतीय खेळाडू अपेक्षांसह खेळताना दिसले. सात आठवड्यांच्या या स्पर्धेनंतर आयपीएलला जगातील सर्वोत्तम स्पोर्टिंग लीगपैकी एक का म्हटले, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. (टीसीएम)
युवा खेळाडूंसाठी आयपीएल दहावे पर्व ठरले चांगले व्यासपीठ
By admin | Published: May 23, 2017 4:34 AM