- ऑनलाइन लोकमत
भारताचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे आयपीएलच्या दहाव्या सत्रात न खेळणे वॉशिंग्टन सुंदरच्या पथ्यावर पडले. त्याने या अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आणि स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने आतापर्यंत १० सामन्यात ८ बळी घेतले आहेत. मुंबई विरोधात त्याने ३ बळी घेत पुण्याला अंतिम फेरीत पोहचवले. आयपीएलच्या आधी रायजींग पुणे सुपरजायंट्सकडून खेळणार होता. मात्र दुखापत आणि सातत्याने क्रिकेट खेळल्याने त्याला डॉक्टरांनी विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तो या सत्रात खेळू शकला नाही. त्याऐवजी पुण्याकडून दक्षीण अफ्रिकेचा स्टार गोलंदाज इम्रान ताहीर खेळला आणि त्याच्या जोडीला संघात तामिळनाडूच्या सतरा वर्षांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करणाºया वॉशिंग्टन सुंंदर याचा समावेश करण्यात आला. सुंदरनेही आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सत्रात संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. हैदराबाद विरोधात पहिला सामना खेळणाºया सुंदरला पहिला बळी दुस-या सामन्यात मिळाला. या सत्रात त्याने मुंबई इंडियन्स विरोधात पहिल्या सामन्यात १ तर क्वालिफायर १ मध्ये तीन बळी घेतले आहेत. सत्रातील आठ पैकी चार बळी त्याने मुंबई विरोधात घेतले. केकेआर विरोधातील सामन्यात त्याने गंभीर आणि जॅक्सन यांना बाद करत केकेआरला चांगलेच बॅकफुटवर ढकलले होते.
भारताच्या १९ वर्षेआतील संघाकडून खेळताना सुंदरने केलेली कामगिरी प्रभावी होती. तो नेहमीच चांगल्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करतो. १९ वर्षे आतील वर्ल्ड कप अंतिम सामन्यात त्याने ९ षटकांत फक्त १८ धावा दिल्या होत्या. आपल्या प्रभावी कामगिरीमुळेच त्याने पुण्याला इम्रान ताहीरची अनुपस्थिती जाणवू दिलेली नाही.