नाईस : युरो चषक २0१६ च्या पहिल्या फेरीतील धमाकेदार विजयाची नोंद करीत आयर्लंडने बलाढ्य इटलीवर १-0 गोलने मात करीत अंतिम १६ संघांत स्थान मिळवले. युरो चषकात दुसऱ्या फेरीत पोहोचण्याची आयर्लंडची ही पहिलीच वेळ आहे. ई गटातील या सामन्यात रोबी ब्रॅडी याने ८५व्या मिनिटाला हा ऐतिहासिक गोल केला. ब्रॅडीने हुलाहान्सच्या क्रॉसवर हा गोल नोंदवला. आता त्यांना यजमान फ्रान्सशी मुकाबला करावा लागेल. पराभूत इटलीचा सामना स्पेनशी होणार आहे. स्टेड पियरे मॉराय स्टेडियममध्ये इटलीने अतिशय आक्रमक खेळून आठ वेळा गोलपोस्टवर धडक मारली; परंतु त्यांना गोल करता आला नाही. सामना संपण्यास १२ मिनिटे शिल्लक असताना इटलीला एक सुवर्णसंधी आली होती. त्यांच्या लोरेंजो इन्सिगने जबरदस्त शॉट मारला; परंतु तो गोलपोस्टच्या खांबाला धडकून गेला. तथापि, सामना हरल्यानंतरही इटली गटात अव्वल स्थानी राहिला.बेल्जियमचा अंतिम १६ संघांत प्रवेशनाईस : सामना संपण्यास काही मिनिटेच शिल्लक असताना मिडफिल्डर रादजा नॅनगोलानने केलेल्या गोलच्या जोरावर बेल्जियमने स्वीडनवर १-० ने विजय मिळवून युरो चषक २०१६च्या अंतिम १६ जणांच्या संघात प्रवेश केला.या पराभवामुळे स्वीडनचा सुपरस्टार ज्लाटन इब्राहिमोविच याला एका वाईट आठवणीसह आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम ठोकावा लागला. नॅनगोलानने ईडन हॅजार्डच्या क्रॉसवर ८२व्या मिनिटाला गोल नोंदवला. यामुळे संघ पुढील फेरी गाठू शकला. त्यांचा सामना आता २६ जूनला हंगेरीशी होईल. स्वीडनचा संघ गटात तिसऱ्या स्थानावर राहिला. गटातील समीकरणामुळे अंतिम १६ जणांत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना विजयाची गरज होती. त्यामुळे दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. बेल्जियमने यात बाजी मारली.
आयर्लंडचा धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 1:10 AM